पुणेकरांवर यंदा कोणतीही करवाढ नाही ! | पुढारी

पुणेकरांवर यंदा कोणतीही करवाढ नाही !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणेकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ न लादता महापालिका आयुक्तांनी 2023-24 या आर्थिक वर्षाचे तब्बल 9 हजार 515 कोटींचे अंदाजपत्रक शुक्रवारी (दि. 24) सादर केले. या अंदाजपत्रकात नवीन प्रकल्पांना फाटा देण्यात आला असून, सुरू असलेले प्रकल्प मार्गी लावण्यावरच भर देण्यात आला आहे. गतवर्षापेक्षा तब्बल 923 कोटींनी फुगविलेल्या अंदाजपत्रकात उत्पन्नाचे कोणतेही नवीन स्रोत दाखविण्यात आलेले नाहीत. तसेच, भांडवली विकासकामांसाठी 3755 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

महापालिका सभागृहाची मुदत मार्च 2022 मध्ये संपल्यानंतर गेले वर्षभर महापालिकेत प्रशासक राज आहे. प्रशासन म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे महापालिकेचा कारभार करत आहे. दरवर्षी प्रशासनाकडून महापालिका आयुक्त फेब—ुवारी महिन्यातच अंदाजपत्रक सादर करतात. मात्र, जी 20 परिषद आणि कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता यामुळे यंदाचे अंदाजपत्रक लांबले होते. महिनाभर लांबलेले 2023-24 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी सादर केले. या वेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, नगरसचिव शिवाजीराव दौंडकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

2022-23 या आर्थिक वर्षासाठी प्रशासनाने 8 हजार 592 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. यामध्ये तब्बल 923 कोटींची भर टाकून आयुक्तांनी 2023-24 चे 9 हजार 515 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत नसताना गतवर्षीच्या तुलनेत 923 कोटींने अंदाजपत्रक फुगविले आहे. समाविष्ट गावांमधील मिळकत कर आणि बांधकाम परवाना शुल्क महापालिकेस मिळणार आहे, शिवाय पीएमआरडीएकडूनही निधी मिळणार आहे. याशिवाय समाविष्ट गावांमुळे जीएसटी अनुदानातही वाढ होणार असल्याचा दावा महापालिका आयुक्तांनी केला आहे.

अंदाजपत्रकामध्ये कोणत्याही प्रकारच्या मोठ्या प्रकल्पाचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, यापूर्वी प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रकल्पांना निधीची तरतूद करून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या वर्षात समान पाणीपुरवठा योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय नदी सुधार व नदी सुशोभीकरण प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर आहेत.

महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यावर भर
महापालिकेमध्ये भाजपची सत्ता असताना प्रस्तावित करण्यात आलेले नदीसुधार, नदीकाठ सुशोभीकरण, मेट्रो, समान पाणीपुरवठा योजना, पी. एम. आवास योजना हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आली आहे.

सुशोभीकरणाच्या खर्चाला कात्री
नगरसेवक आपल्या यादीतून प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करतात. निधी संपविण्यासाठी म्हणून एका ठिकाणी एक प्रकारचे सुशोभीकरण केले जाते. मात्र, महापालिका सभागृहाची मुदत संपल्याने महापालिकेचा कारभार असल्याने आणि सध्या नगरसेवक नसल्याने यंदाच्या अंदाजपत्रकात सुशोभीकरणासाठी तरतूदच केलेली नाही. जी-20 परिषदेचा निधी आल्यानंतर त्या पैशातून सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.

500 ठिकाणी चार्जिंग स्टेशन
पर्यावरणपूरक ई-दुचाकी योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा ठिकाणी एकूण 500 ठिकाणी ई-दुचाकी चार्जिंग स्टेशन खासगी सहभागातून उभारले जाणार आहेत. ई-दुचाकी चार्जिंग करण्यासाठी तसेच नागरिकांना ई-दुचाकी भाड्याने उपलब्ध करून देण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारणीला परवानगी दिली जाणार आहे. शेअरिंग पद्धतीने भाडेतत्त्वावर खासगी ई-दुचाकीसाठी चार्जिंग स्टेशन उपलब्ध होणार आहे.

वेळेवर मिळकतकर भरणार्‍यांना बक्षीस योजना
मिळकतकराची थकबाकी असणार्‍या नागरिकांनी कर भरावा, यासाठी महापालिकेकडून अभय योजना राबविली जाते. मात्र, प्रामाणिकपणे कर भरणार्‍यांसाठी योजना राबविल्या जात नाहीत. त्यामुळे वेळेवर मिळकतकर भरणार्‍यांसाठी अंदाजपत्रकात बक्षीस योजना जाहीर करण्यात आलेली आहे, यासाठी 1 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

डॉग पार्क, हॉकर्स पार्क
शहरात श्वानांसाठी स्वतंत्र डॉग पार्क उभारण्याचे प्रस्तावित असून, त्यावर कार्यवाही सुरू आहे. तसेच, शहरातील अ‍ॅमेनिटी स्पेस तसेच ओपन स्पेसवर पथारी व्यावसायिकांसाठी हॉकर्स पार्क साकारण्यासाठी
अंदाजपत्रकात प्रस्तावित केले आहे.

पीएमपीची तूट भरून काढण्यासाठी 459 कोटी
पीएमपीची तूट भरून काढण्यासाठी 459 कोटी 46 लाख रुपयांची तरतूद केली आहे. तसेच दिघी ते आळंदी, मुकाई चौक ते भक्ती-शक्ती व बोपोडी ते वाकडेवाडी, असे 3 बीआरटी कॉरिडॉर्स प्रस्तावित असून, या तिन्ही कॉरिडॉर्सची एकूण लांबी 17.5 किमी इतकी आहे.

हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प
कचर्‍यापासून हायड्रोजन प्रकल्प उभारला जाणार आहे. केंद्र शासनपुरस्कृत ‘अमृत 2.0 अभियान’अंतर्गत पाणीपुरवठा घटकांतर्गत वडगाव येथे नवीन रॉ वॉटर पंपिंग स्टेशन व जलशुध्दीकरण केंद्र बांधणे या प्रकल्पासाठी 50 कोटी व मलनिस्सारण या घटकांतर्गत अस्तित्वातील एकूण 6 एसटीपीच्या सुधारणा आणि विस्तारासाठी 10 कोटींची तरतूद प्रस्तावित आहेत. या दोनही प्रकल्पांचा अहवाल एमजेपीच्या तांत्रिक मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. तसेच, बंडगार्डन येथील बंधार्‍यावर (हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प) मिनी हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्लांट उभारून अंदाजे 350 किलोवॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी 700 लक्ष तरतूद करण्यात आली आहे.

समाविष्ट गावांसाठी 400 कोटींचे कर्ज

अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट 23 गावांसाठी पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि पावसाळी गटारांच्या कामांसाठी सुमारे अकराशे कोटींची कामे प्रस्तावित आहेत. तसेच, जायकामार्फत 400 कोटींचे कर्ज घेऊन समाविष्ट गावांत सुविधा केल्या जातील. पुढील काही महिन्यांत आंबेगाव, वाघोली, मांजरी येथील पाणीपुरवठ्याची कामे देखील सुरू होतील. खोदाईची कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची कामे करण्यात येतील, असे विक्रम कुमार यांनी नमूद केले.

अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यावर भर

शहराचा वाढता विकास, नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विचार करून अग्निशमन केंद्रांची संख्या वाढविणे, तसेच मध्यवर्ती अग्निशमन केंद्र येथे अग्निशमन केंद्राची नवीन इमारत उभारणे प्रस्तावित आहे. तसेच, खास निधीचे अंदाजपत्रकातील तरतुदीमधून हायराईज फायर फायटिंगची 4 वाहने, 2 रेस्क्यू व्हॅन साहित्यासह, 1 फायर फायटिंग अँड रेस्क्यू वाहन (24 मीटर उंच शिडीसह) अशी अग्निशमन वाहने खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे.

मुळा, मुठा नदीवर दोन नवे पूल

सिंहगड रस्ता ते कर्वेनगर यादरम्यान मुठा नदीवर, तसेच सांगवी ते बोपोडीदरम्यान मुळा नदीवर पूल बांधण्यात येणार आहेत. दहा वर्षांपेक्षा जास्त जुन्या पुलांचे दुरुस्तीचे कामही 2023-24 या आर्थिक वर्षात हाती घेण्यात येणार आहे. सिंहगड रस्ता सनसिटी येथून कर्वेनगरसाठी नवीन पूल बांधण्यासाठी 40 कोटी रुपयांची तरतूद सुचविली आहे. सांगवी-बोपोडी दरम्यानचा पूल पिंपरी चिंचवड महापालिका बांधणार असून, त्याचा निम्मा खर्च पुणे महापालिका करणार आहे. त्यासाठी 18 कोटी रुपये लागणार असून, येत्या वर्षात 15 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

कचर्‍यापासून हायड्रोजननिर्मिती

कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याद्वारे पर्यावरणपूरक आणि कमी किमतीतील हायड्रोजनची निर्मिती करणारा प्रकल्प रामटेकडीला उभारण्यात येणार आहे. त्यासाठी भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरचे मार्गदर्शन घेणार असल्याचे महापालिकेच्या अंदाजपत्रकात नमूद करण्यात आले आहे. पुण्यातील तीन प्रमुख रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याची प्रक्रिया येत्या वर्षात राबविण्यात येईल.

प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करणार

शहराच्या गावठाणातील ड्रेनेजच्या जुन्या वाहिन्या बदलल्यामुळे लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, केळकर रस्ता यांचे संपूर्ण डांबरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. बालभारती ते पौड रस्ता यांना जोडणार्‍या रस्त्याचे कामही आगामी वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे. त्याची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल. दहा किलोमीटर मार्गावर नवीन सायकल ट्रॅकचे काम पुढील वर्षी हाती घेण्यात येईल.

Back to top button