पुणे : आता विमानातील पायलटही देणार ढगातील आर्द्रतेचे संदेश | पुढारी

पुणे : आता विमानातील पायलटही देणार ढगातील आर्द्रतेचे संदेश

आशिष देशमुख : 

पुणे : गेल्यावर्षी हिवाळ्यात पडलेल्या दाट धुक्यामुळे देशभरातील अनेक विमान उड्डाणे रद्द झाल्याने त्या कंपन्यांना कोट्यवधींचे नुकसान झाले, ही बाब लक्षात घेत सरकारने हवामान विभागाच्या मदतीने देशातील 55 विमानतळांवर स्वयंचलित हवामान केंद्रे बसवली आहेत. त्यामुळे आता विमानाचे टेकऑफ व लँडिंग होण्यातील अडथळे दूर झाले. आता विमानांचे पायलटही ढगातून जाताना त्यातील आर्द्रतेची माहिती हवामान विभागाच्या पोर्टलवर पाठवण्याचे काम करणार आहेत. उत्तर भारतासह देशभरातील मोठ्या विमानतळांवरील विमाने हवामानातील बदल व हिवाळ्यात पडणार्‍या दाट धुक्यामुळे अनेकवेळा रद्द करण्याबरोबरच वळवली जातात.

याचा आर्थिक फटका विमान कंपन्यांसह प्रवाशांनाही बसतो. ही बाब लक्षात घेत केंद्र सरकारने हवामान विभागाच्या मदतीने एक अनोखा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेतला. हवामान विभागाने विकसित केलेल्या स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट 2022 मध्ये देशातील तब्बल 55 विमानतळांवर अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेचा फायदा केवळ विमानांनाच नव्हे; तर पायलट, प्रवासी अन् विमान कंपन्यांना होणार असून, यापुुढे कोणतेही विमान दाट धुक्यामुळे रद्द करण्याची वेळच येणार नाही.

ढगांमधील आर्द्रतेवरून पावसाचा अंदाज
देशभरातील 55 विमानतळांवर बसविण्यात आलेल्या यंत्रणेचा फायदा हवामान विभागालादेखील होणार आहे; कारण विमानात बसवलेल्या किटची लिंक विमानतळावरील यंत्रणेशी जोडली जाणार आहे. ढगांतून जाणार्‍या विमानाद्वारे त्यातील आर्द्रता किती, याचा संदेश थेट हवामान विभागाच्या केंद्रात मिळणार आहे. यात पायलटची भूमिका महत्त्वाची राहील. यामुळे पाऊस किती वेळानंतर, किती तीव्रतेने पडेल, याचा अंदाज बांधणे सोपे होणार आहे.

देशात शंभरपेक्षा जास्त विमानतळ आहेत. तेथील वाहतुकीचा अंदाज घेत अशाच प्रकारची यंत्रणा देशभरातील वर्दळ असणार्‍या विमानतळांवर विभागनिहाय बसवण्याचे नियोजन आहे. यामुळे हवामान खात्याला हवामानातील बदलाचा विभागीय डेटा मिळण्यास मदत होणार आहे.

भारतीय हवामान विभागाने 55 विमानतळांवर स्वयंचलित हवामान यंत्रणा कार्यान्वित केली आहे. काही कारणांमुळे यंत्रणा बंद पडू नये, यासाठी स्वयंचलित हवामान यंत्रणेला बॅकअप देणारे अतिरिक्त पॉवर स्टेशन जोडण्यात आले आहेत. यंत्रणेच्या यशाचा आलेख खूप चांगला दिसून आला आहे.
           – डॉ. कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, आयएमडी, पुणे

 

 

Back to top button