बारामती : फायनान्स कंपनीच्या कामगाराला खराडेवाडी येथे कोयत्याने मारहाण | पुढारी

बारामती : फायनान्स कंपनीच्या कामगाराला खराडेवाडी येथे कोयत्याने मारहाण

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  फायनान्स कंपनीकडून दिलेल्या कर्जाचा हप्ता वसूल करण्यासाठी गेलेल्या कंपनीच्या कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला करत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडेवाडी (ता. बारामती) येथे मंगळवारी (दि. 14) हा धक्कादायक प्रकार घडला. संदीप भरत जांबले (रा. वासुंदे, ता. दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोराचे नाव आहे. याप्रकरणी किसन संभाजी पवार (रा. डोर्लेवाडी, ता. बारामती) यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी किसन पवार हे चोलामंडल फायनान्समध्ये सेल्स एक्झ्युक्युटिव्ह म्हणून काम करतात. संदीप जांबले यांनी वाहन घेण्यासाठी या फायनान्स कंपनीकडून चार लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याचा हप्ता थकला असल्याने पवार यांचे नवनाथ जांबले व संदीप जांबले यांच्याशी बोलणे सुरू होते. संदीप यांनी हप्ता देण्यासाठी पवार यांना वासुंदे येथे बोलावले. पवार हे तिकडे निघाले असताना खराडेवाडी येथे एका हॉटेलसमोर थांबले. या वेळी तेथे जांबलेंसह सहा-सातजणांचे टोळके आले.

त्यातील एकाने ‘पवार हेच का?’ अशी विचारणा केली. त्यावर संदीप यांनी ‘हाच तो पवार,’ असे म्हणत त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने डोक्यात वार केला. अन्य साथीदारांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पवार यांना जखमी केले. तसेच ‘तू जर हप्ता किंवा गाडीसंबंधी विचारणा केली, इकडे परत जर दिसला तर जिवानिशी जाशील,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वडगाव निंबाळकर पोलिस तपास करत आहेत.

Back to top button