पुणे : शहरात ‘एच3एन2’चे 13 सक्रिय रुग्ण | पुढारी

पुणे : शहरात ‘एच3एन2’चे 13 सक्रिय रुग्ण

पुणे : शहरात जानेवारी ते मार्च या कालावधीत ’एच3एन2’चे 146 रुग्ण आढळून आले आहेत. सध्या 13 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 7 रुग्ण विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, 6 रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. दाखल रुग्णांपैकी 4 जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पुणे महापालिका हद्दीत सद्य:स्थितीत 12 स्वॅब सेंटर सुरू आहेत. घशातील स्त्रावाचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात येतात. सध्या रुग्णांसाठी बाणेर येथील रुग्णालयात 200 बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात 50 बेड उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. इन्फ्लूएन्झा विषाणूच्या ’एच3एन2’च्या साथीच्या पार्श्वभूमीवर, फ्लूसदृश आणि श्वसन संक्रमणाच्या रुग्णांच्या उपचार आणि तपासणीसाठी महापालिकेच्या सर्व रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व खासगी रुग्णालयांना दैनंदिन माहिती देण्याबाबतही कळवण्यात आले आहे. उपचार आणि तपासणीसंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

इन्फ्लूएन्झा तपासणी शुल्क पाच हजारांच्या घरात

इन्फ्लूएन्झा विषाणूचा संसर्ग वाढत असताना उपचार आणि तपासण्यांवर भर दिला जात आहे. मात्र, खासगी प्रयोगशाळांमध्ये तपासणीचे शुल्क पाच ते सहा हजारांच्या घरात आहे. सध्या किटची मागणी कमी असल्याने किंमत जास्त असल्याचे सांगितले जात आहे. इन्फ्लूएन्झाच्या निदानासाठी कोव्हिडसाठी केली जाणारी आरटीपीसीआर हीच तपासणी केली जाते. मात्र, त्यासाठी वापरल्या जाणार्‍या किटच्या साहाय्याने चार प्रकारच्या विषाणूंची तपासणी केली जाते.

यामध्ये इन्फ्लूएन्झाचे एच1एन1 आणि एच3एन2 हे उपप्रकार, इन्फ्लूएन्झा बी आणि आरएसव्ही यांचा समावेश असतो, अशी माहिती पॅथॉलॉजिस्ट डॉ. मंदार परांजपे यांनी दिली. तपासणीसाठी कोरोनाप्रमाणेच घशातील किंवा नाकातील स्त्रावाचा नमुना घेतला जातो. सध्या महापालिकेच्या रुग्णालयांमधील संशयित रुग्णांच्या स्वॅबचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवले जात आहेत. त्यासाठी 12 संकलन केंद्रांवर ’स्वॅब’ अर्थात नमुने संकलित केले जात आहेत.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात तपासणीची किंमत 5 ते 6 हजार रुपये इतकी होती. किट बनवणार्‍या कंपन्या मर्यादित असल्याने किंमत जास्त होती. कोरोना वाढू लागल्यानंतर किटची मागणी वाढली. त्यामुळे तपासणीची किंमत 500 रुपयांंपर्यंत कमी झाली. सध्या एच3एन2 च्या तपासणीचे प्रमाण कमी असल्याने किटचे आणि पर्यायाने तपासणीचे शुल्कही जास्त आहे. – डॉ. शार्दुल सहाणे, लॅब चालक

एका किटच्या साहाय्याने चार प्रकारच्या विषाणूंची तपासणी करता येणे शक्य आहे. शहरातील नामांकित प्रयोगशाळांमध्ये सध्या दररोज 5 ते 10 रुग्णांचे नमुने ’एच3एन2’ तपासणीसाठी येत आहेत. कोव्हिडच्या किटवर सरकारी नियंत्रण आल्याने तपासणीच्या किमती कमी झाल्या.

एच3एन2 ग्रस्त रुग्णांची महिनानिहाय आकडेवारी
जानेवारी : 27
फेब—ुवारी : 89
मार्च : 46

 सक्रिय रुग्ण : 13
महापालिकेकडे उपलब्ध औषध साठा
टॅमी फ्लू – 56,000 श्र रेमडिसिव्हिर इंजेक्शन – 792 व्हायल
पीपीई किट – 35,800 श्र रॅट किट – 3.25 लाख
एन 95 मास्क – 25 हजार श्र डिस्पोजेबल मास्क – 1 लाख 73

Back to top button