अखेर ठरलं ! २ एप्रिल रोजी खेड शिवापूर टोलनाक्यावर जनआंदोलन | पुढारी

अखेर ठरलं ! २ एप्रिल रोजी खेड शिवापूर टोलनाक्यावर जनआंदोलन

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा :  मागील काही दिवसांपासून खेडशिवापूर टोलनाक्यावर भोर व वेल्हा तालुक्यातील स्थानिकाकडून जबरदस्तीने टोल वसुली करण्यात येत आहे. याचा दोन्ही तालुक्यात उद्रेक होत असून याबाबत टोल वसुली बंद व टोलनाका स्थलांतरसाठी २ एप्रिल रोजी सर्वपक्षीयाच्या वतीने मोठ्या स्वरूपात जन आंदोलन करण्याचा निर्धार शिवापुर टोलनाका हटाव कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.

पुणे – सातारा महामार्गावरील खेड शिवापूर (ता. हवेली) येथील जाचक टोलनाका हटावसाठी सर्वपक्षीय स्थापित असलेल्या शिवापुर टोलनाका हटाव कृती समितीची बैठक केळवडे (ता. भोर) येथे गुरुवारी (दि. १६) दुपारी पार पडली. यावेळी कृती समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर, भाजपचे जीवन कोंडे, बाळासाहेब गरुड, कॉग्रेसचे शैलेश सोनवणे, लहूनाना शेलार, डॉ. संजय जगताप, शिवसेनेचे (ठाकरे गट) ज्ञानेश्वर शिंदे, हनुमंत कंक, दिपक दामगुडे, आदित्य बोरगे, राष्ट्रवादीचे महेंद्र भोरडे, दादासाहेब पवार, शुभम यादव, विजय जंगम, भाऊ शिंदे व दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.

बैठकीत ज्ञानेश्वर दारवटकर म्हणाले की, मागील आंदोलन हे मोडीत काढण्याचे काम काही शकुनी मामाच्या पाठिंब्याने पोलिसांनी केले होते. यासाठी सर्वपक्षाच्या नेत्यांनी आदेश देऊन हालचाल करणे गरजेचे आहे. मात्र ते दिसून येत नाही. टोलनाका हटविण्यासाठी सर्वपक्षांच्या वतीने आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. तर शैलेश सोनवणे म्हणाले की, खेड शिवापूर टोलनाकाबाबत प्रशासनाची नीती कायम ब्रिटिशासारखी आहे. २ एप्रिलचे होणारे आंदोलन हे शेवटचे असून कोल्हापूरच्या धर्तीवर टोलनाका हटवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन तळागाळात जावून जनजागृती करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच बैठकीत आदी मान्यवरांनी देखील आक्रमक भूमिका मांडली.

गनिमी काव्याने जनआंदोलन उभारणारच

सन २०१८ पासून वेळोवेळी झालेल्या आंदोलनवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोलवसुली प्रशासन कडून नुसतीच गाजरे दाखविण्याचे काम करण्यात आले आहे. आता मात्र प्रशासन किती ताकद लावली तरी करो या मरो यानुसार २ एप्रिलला गनिमी काव्याने खेडशिवापुर टोलनाक्यावर मोठ्या स्वरूपात सर्व पक्षाच्यावतीने जनआंदोलन करण्याचा निर्धार देखील बैठकीत करण्यात आला.

राष्ट्रवादीचे बडे नेते नेहमीच गैरहजर

सर्वपक्षीय स्थापित असलेल्या शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या वेळोवेळी होणाऱ्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते नेहमीच गैरहजर राहतात. औपचारिकतासाठी केवळ एखादा कार्यकर्ता हजर असतात. बैठकीत देखील याबाबत कुजबुज सुरू होती. टोलनाका आंदोलनवेळी खासदार सुप्रिया सुळे येतील त्याच वेळेस तालुक्यातील बडे नेते येतात.

Back to top button