पुणे : शिक्षक बदल्यांसाठी अभ्यासगट स्थापन | पुढारी

पुणे : शिक्षक बदल्यांसाठी अभ्यासगट स्थापन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी नव्याने अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. अभ्यासगटाने बदल्यांबाबत गतवर्षी आलेल्या अडचणी, शिक्षक संघटनांशी प्रातिनिधिक चर्चेतून बदल्यांच्या धोरणा बाबत शिफारशींचा विचार 2023 च्या बदल्यांमध्ये केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांबाबत संभाव्य वेळापत्रकाबाबत एका महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. नव्या अभ्यास गटामध्ये पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, कोकण विभागीय आयुक्त कार्यालय उपायुक्त, ग्रामविकास विभागातील जिल्हा परिषद आस्थापनेचे उपसचिव, अतिरिक्त सचिव यांचा समावेश आहे. ग्रामविकास विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांचे सुधारित धोरण निश्चित करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली 2020 मध्ये अभ्यासगट स्थापन करण्यात आला. या अभ्यास गटाच्या शिफारशींनुसार विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांच्या अडचणी लक्षात घेऊन 2021मध्ये सुधारित धोरण निश्चित करण्यात आले. त्यानुसार शिक्षक बदल्यांसाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करून त्याद्वारे आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली. जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. बदल्यांबाबत शिक्षक संघटनांकडून शासनाला निवेदने देण्यात आली. तसेच न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर शासनाने न्यायालयात मांडलेल्या भूमिकेला अनुसरून बदल्यांबाबत 2021 मधील तरतुदी आणि सूचना, निवेदने याबाबत अभ्यासगटाकडून शिफारशी घेणे आवश्यक आहे.

Back to top button