शिवतारे यांची काढली मिरवणूक; पुरंदर उपसाचा दर कमी केल्याने सत्कार | पुढारी

शिवतारे यांची काढली मिरवणूक; पुरंदर उपसाचा दर कमी केल्याने सत्कार

सासवड(पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : एकोणीस टक्के दराने पाणी मिळण्यास सुरुवात झाल्याने पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयाबद्दल आंबोडी, वनपुरी, उदाचीवाडी, गुरोळी, वाघापूर, टेकवडी, माळशिरस, राजेवाडी, बेलसर, पिसर्वे, मावडी, पिंपरी, भोसलेवाडी, दिवे, जाधववाडी, काळेवाडी, पवारवाडी, राजुरी, रिसे पिसे आदी गावांतील शेतकर्‍यांनी वाघापूर-चौफुल्यापासून पंप हाऊसपर्यंत माजी मंत्री विजय शिवतारे यांची मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला. शिवतारे यांचा या वेळी शेतकर्‍यांनी सत्कार केला.

शिवतारे म्हणाले, की राज्यमंत्री असताना पुरंदर उपसा योजनेचे पाणी 19 टक्के दरात द्यायला सुरुवात केली होती. सन 2019 ला राज्यात महाविकास आघाडीचे निष्क्रिय सरकार आले. त्यांनी वीजदर वाढवून तिप्पट केला. त्यामुळे आपोआप पाण्याचा दरही गगनाला भिडला. राज्यात सत्ताबदल झाल्यावर सासवड येथील शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडे हा दर कमी करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी ती तत्काळ मान्य करीत 25 ऑगस्ट रोजी वीजदरात कपात करण्याचा आदेश काढला. त्यानंतर 5 महिने जलसंपदा विभाग आणि कृष्णा खोरे महामंडळाकडे पाठपुरावा करून पाण्याचा दर कमी करून घेतला. आता यापुढे हा दर 18,924 रुपये असेल. सर्व हंगामात तो एकसारखाच असेल.

विरोधकांकडून दिशाभूल
विद्यमान आमदार, खासदार आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना वारंवार विनंती करूनही पुरंदरच्या शेतकर्‍यांची कुणी दखल घेतली नाही. पण, आता सगळ्यांची श्रेयासाठी धांदल उडाली आहे. तीन वर्षांत सरकार असताना जे लोक काहीच करू शकले नाहीत, ते आता लोकांची दिशाभूल करीत आहेत, अशी टीका शिवतारे यांनी केली.

Back to top button