खेडमध्ये गव्हाच्या 9 पारंपरिक वाणांची लागवड | पुढारी

खेडमध्ये गव्हाच्या 9 पारंपरिक वाणांची लागवड

सुषमा नेहरकर- शिंदे

पुणे : खेड तालुक्यात चासकमान धरणाच्या कुशीत वसलेल्या सह्याद्री स्कूलच्या नैसर्गिक शेतीत गव्हाच्या एक-दोन नाही तर तब्बल नऊ विविध प्रकाराच्या पारंपरिक वाणांची लागवड करण्यात आली आहे. आपल्या देशातील स्थानिक, पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक व देशी वाणांचा स्थानिक शेतक-यांमध्ये प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सह्याद्री स्कूलच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. सध्या शाळेच्या नैसर्गिक शेतीत लावलेले गव्हाचे पीक काढणीला आले आहेत.

खेड तालुक्यातील कृष्णमूर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कूलच्या वतीने शिक्षण क्षेत्रासोबतच स्थानिक शेतक-यांसोबत नैसर्गिक शेतीचेदेखील काम केले जाते. देशी बियाणे संवर्धक व समन्वयक दीपा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री स्कूल गेल्या अनेक वर्षांपासून येथे नैसर्गिक शेती करीत आहे. तब्बल 65 एकर परिसरात ही निवासी शाळा असून, येथे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना पौष्टिक, शुध्द व विषमुक्त अन्न मिळावे म्हणून शाळेच्या परिसरातच मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेतीचे अनेक प्रयोग केले जातात.

याचाच एक भाग म्हणून येथे यंदाच्या रब्बी हंगामात पारंपरिक गव्हाच्या आठ-नऊ विविध प्रकारच्या वाणांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये बन्सी गहू, जोंधळी गहू, खपली गहू, पीसी गहू, काळा गहू, काठिया व्हाईट हस्क, काळी कुसळ गहू अशा विविध वाणांचे गहू लावण्यात आले आहेत.

यामध्ये पुरणपोळीसाठीचा वेगळा गहू, मैद्यासारखेच पीठ देणारा गहू, चपात्यासाठीचा वेगळा गहू असे सर्व गरजा पूर्ण करणारे अनेक प्रकारचे पारंपरिक वाण आपल्याकडे असल्याचे दीपा मोरे यांनी सांगितले. यामध्ये सध्याच्या बदलत्या हवामानामध्ये तग धरणारे, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे आपले देशी वाण नष्ट होत चालले असून, या देशी व पारंपरिक वाणांचा स्थानिक शेतक-यांमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी सह्याद्री स्कूल काम करत असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले.

पारंपरिक आणि देशी वाण अधिक कसदार असतात. त्या-त्या भागात जगण्यासाठी लागणारी पोषणमूल्ये त्यातून मिळतात. इतर वाणांमुळे जास्त उत्पादन मिळेल, पण त्यात कस (पोषणमूल्य) किती असतो, हा प्रश्नच आहे. चवीचंही तसंच. गोडी, खमंगपणा, गंध याबाबतीत हेच वाण सरस ठरतात. या स्थानिक जाती असल्यानं इथल्या वातावरणात टिकून राहतात. रोगाला बळी पडत नाहीत. रासायनिक खतांची, कीटकनाशकाची गरज लागत नाही. त्यामुळे मशागतीचा खर्च कमी, बियाण्यांचाही वेगळा खर्च नाही. पिकांची विविधताही टिकून राहते आणि विषमुक्त व भरपूर नैसर्गिक न्यूट्रिशन असलेले अन्न मिळते.

 – दीपा मोरे, देशी बियाणे संवर्धक व समन्वयक, सह्याद्री स्कूल आउटरिच (कृष्णामूर्ती फौंडेशन)

Back to top button