पुणे : 17 वर्षांनंतर रिक्षाचालकांचे कल्याण | पुढारी

पुणे : 17 वर्षांनंतर रिक्षाचालकांचे कल्याण

पुणे : रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या घोषणा यापूर्वी अनेकदा झाल्या. पहिल्यांदा अशी मागणी 2005 साली रिक्षाचालकांकडून झाली होती. राज्याच्या बजेटमध्ये केलेल्या घोषणेमुळे रिक्षाचालक पुन्हा सुखावले असून, ही घोषणा पुन्हा हवेतच जाऊ देऊ नका, अशी अपेक्षा रिक्षाचालकांकडून व्यक्त केली जात आहे.

राज्यस्तरावर रिक्षाचालकांच्या कल्याणासाठी एखादे मंडळ असावे, याकरिता पुण्यातील रिक्षा संघटनांनी एकत्र येत 2005 साली रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे, यासाठी मागणी केली होती. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. या घटनेला आता 17 वर्षे उलटली आणि हा प्रस्ताव अजूनही बारगळलेलाच आहे. यामुळे रिक्षाचालकांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. मात्र, आता रिक्षाचालकांमध्ये पुन्हा एक आशा निर्माण झाली आहे.

रिक्षा चालकांसाठी कोणत्या योजना सुरू व्हाव्यात?
अपघात झाल्यास विमा, आर्थिक मदत मुलांना शिक्षणासाठी मदत
आरोग्यविषयक विमा रिक्षाचालकांना कर्ज रिक्षाचालकांना पेन्शन

किती आहेत रिक्षा?
पुणे शहर
91 हजार 454
पिंपरी-चिंचवड
26 हजार 600

रिक्षा कल्याणकारी मंडळ स्थापन करणे, ही 2005 सालापासून रिक्षाचालकांची मागणी आहे. 2008 ते 2014 दरम्यान मी आरटीए सदस्य असताना हा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविला होता. आता राज्य शासनाने याची घोषणा केली. त्याचे स्वागत आहे. फक्त ही घोषणा न ठेवता तातडीने अंमलबजावणी करून मंडळाची स्थापना करावी. मंडळ स्थापन करताना रिक्षातज्ज्ञांची मते शासनाने जाणून घ्यावीत.

            – बाबा शिंदे, माजी सदस्य, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (आरटीए)

रिक्षाचालकाला सामाजिक सुरक्षा देण्यासाठी राज्य शासनाने रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करायला हवी, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची आमची मागणी आहे, यासाठी आम्ही अनेक पाठपुरावे केले आहेत. राज्य शासनाने मंडळ स्थापन करणारी घोषणा आम्हाला सुखावणारी आहे. मात्र, ही घोषणाच न ठेवता, तातडीने मंडळाची स्थापना करावी.
                               – नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत

रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना ही चांगली बातमी आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, ही फक्त घोषणाच ठेवू नये. तिची तातडीने अंमलबजावणी करावी. मंडळ स्थापन करताना शासनाने रिक्षाचालकांच्या मागण्यांचा सुद्धा विचार करावा.

                                        – बाप्पू भावे, खजिनदार, रिक्षा फेडरेशन

Back to top button