पुणे : धक्कादायक ! शेतकऱ्यांनी पळसदेव गावात चक्क केली अफूची सामूहिक शेती | पुढारी

पुणे : धक्कादायक ! शेतकऱ्यांनी पळसदेव गावात चक्क केली अफूची सामूहिक शेती

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावात सहा शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या अफूची शेती केली होती. भीमा नदीच्या खोऱ्यात ही शेती केल्याचा प्रकार समोर आला. मक्याच्या शेतात आंतरपीक म्हणून या शेतकऱ्यांनी अफूचे पीक घेतल्याने पोलीस देखील चक्रावून गेले होते. याठिकाणी पोलीसांनी कारवाई करत ७ हजार ८७ किलो वजनाचा एकूण १ कोटी ४१ लाख ७४ हजार रूपये किमतीचा माल जप्त केला आहे.

या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात एनडिपीएस कायद्यानुसार सहा व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काशीनाथ रामभाऊ बनसुडे, दत्तात्रय मारूती बनसुडे, राजाराम दगडु बेलार, लक्ष्मण सदाशिव बनसुडे, माधव मोतीराम बनसुडे आणि रामदास जगन्नाथ शिंदे (सर्व रा. माळेवाडी पळसदेव, ता. इंदापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत.

पळसदेव, माळवाडी आणि शेलारपट्ट्यातील काही शेतकऱ्यांनी मक्याच्या पिकात आंतरपीक म्हणून ही लागवड केली होती. या पिकाची पूर्ण वाढ झाली होती. पीक काढणीस येणाच्या मोसमातच पोलिसांना याचा सुगावा लागल्याने आता ते या शेतकऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. पोलीसांना या शेतीचा सुगावा लागताच या ठिकाणी धाड टाकून मोठी कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान दोन दिवस बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे घटनास्थळी तळ ठोकून होते.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील पळसदेव मधील माळेवाडी गावचे हद्दीत जमीन गट नंबर 51/2, गट नंबर 166/ब, गट नंबर 166/2/ब, गट नंबर 2, गट नंबर 4, गट नंबर 26/1 मध्ये वरील व्यक्तींनी विनापरवाना बेकायदेशीरपणे ही लागवड केली होती. यावर कारवाई करण्यात आली असून सहा व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक महेश माने तपास करीत आहेत.

Back to top button