पुणे : वाहनांच्या लिलावातून 79 लाखांची कमाई; 142 जप्त वाहनांचा लिलाव | पुढारी

पुणे : वाहनांच्या लिलावातून 79 लाखांची कमाई; 142 जप्त वाहनांचा लिलाव

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे आरटीओला जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावातून तब्बल 79 लाख 5 हजार 700 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. याकरिता आरटीओ प्रशासनाने गेल्या 14 महिन्यांत जप्त केलेल्या 142 वाहनांचा लिलाव केला. यात बस, ट्रक, रिक्षा, कार आणि मोटार कॅबचा समावेश आहे. मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनांवर परिवहन विभागाकडून दंडात्मक वाहन जप्तीची कारवाई करण्यात येते.

त्यानुसार पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत असलेल्या वायुवेग पथकांनी वाहन जप्तीची कारवाई केली. जप्त केलेली वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय संगमब्रीज, आळंदी रस्ता येथे ठेवण्यात आली होती. त्या वाहनांची लिलाव प्रक्रिया करण्यात आली. त्यापूर्वी आरटीओने वाहनचालकांना थकीत कर भरण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. थकीत कर भरण्यास उपस्थित न राहिल्यामुळे आरटीओ प्रशासनाने अनेक दिवसांपासून पडून असलेल्या जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव केला.

…असा झाला लिलाव

जानेवारी ते डिसेंबर 2022 मध्ये 95 गाड्यांचा लिलाव करण्यात आला. त्यातील 35 वाहने विकली गेली. त्याद्वारे आरटीओला 44 लाख 39 हजार 600 रुपयांचा महसूल मिळाला. तर जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 या दोन महिन्यांत 47 वाहनांचा लिलाव करण्यात आला. त्यातील 12 वाहने विकली गेली. त्यात आरटीओला 34 लाख 66 हजार 100 रुपयांचा महसूल मिळाला. असा एकूण 14 महिन्यांचा मिळून 79 लाख 5 हजार 700 रुपयांचा महसूल आरटीओला प्राप्त झाला आहे. आणखी वाहने शिल्लक राहिली असून, त्यांचासुध्दा पुन्हा लिलाव करण्यात येणार आहे.

लिलावातील विक्रीची वाहने…
अक्र. वाहनप्रकार संख्या
1) बस 50
2) ट्रक (गुडस) 60
3) कार 01
4) मोटार कॅब (टॅक्सी) 27
5) रिक्षा 03
6) मेंटेनन्स व्हॅन 01
एकूण वाहने 142

वाहनचालकांकडून मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केले जाते. तेव्हा त्यातील काही वाहने थकीत कर असल्यामुळे जप्त केली जातात. ती वाहने कर भरून वाहनचालकांनी सोडविली नाही तर त्यांचा लिलाव केला जातो. त्यानुसार आत्तापर्यंत 14 महिन्यांत 142 वाहनांचा लिलाव करण्यात आला असून, 79 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
                                                    – संजीव भोर,
                                     उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Back to top button