पुणे : भुयारी मार्गावरील बांधकाम काढले ; पौड रोड येथील नागरिकांत समाधान | पुढारी

पुणे : भुयारी मार्गावरील बांधकाम काढले ; पौड रोड येथील नागरिकांत समाधान

पौड रोड : पुढारी वृत्तसेवा :  पौड रोडवरील किनारा हॉटेलजवळ असलेल्या भुयारी मार्गावर बांधकाम करण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा होत होता. याबाबत दै. ‘पुढारी’मध्ये नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने या ठिकाणी असलेले बांधकाम काढल्याने वाहतुकीला होणार अडथळा दूर झाला आहे. यामुळे वाहनचालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेकडून शहरात ठिकठिकाणी भुयारी मार्गांचे नियोजन केले आहे.

पौड रोडवरील किनारा हॉटेलजवळ भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. त्यातच मेट्रो स्टेशनमुळे अगोदरच हा रस्ता अरुंद झाला आहे. त्यातून वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. भुयारी मार्गावर बांधकाम करण्यात आल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे हे धोकादायक बांधकाम काढण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या गिरीष गुरनानी यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली होती. या समस्याला दै. ‘पुढारी’ने पौड रोडवरील भुयारी मार्गावरील बांधकामामुळे वाहतुकीस अडथळा‘ या मथळ्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने हे बांधकाम काढल्याने नागरिक व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.

Back to top button