पुणे : उपासमारीने बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू | पुढारी

पुणे : उपासमारीने बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

मंचर : पुढारी वृत्तसेवा : नारोडी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी संताजी मारुती नाईक यांच्या उसाच्या शेताच्या बाजूला असलेल्या ओढ्यात 5 महिने वयाचा बिबट्याचा मादी बछडा मृतावस्थेत शुक्रवारी (दि. 24) सकाळी 11 वाजता आढळून आला. या बछड्याचा पाय मोडल्याने त्याला अन्न-पाणी न मिळाल्याने उपासमारीने मृत्यू झाल्याचे वनपाल संभाजी गायकवाड यांनी सांगितले. संताजी नाईक हे त्यांच्या शेतातील ऊसाला पाणी भरत होते. या वेळी त्यांना शेताच्या बाजूला अशक्त अवस्थेतील बछडा बसलेला दिसला. त्यांनी याबाबत रेस्कू टीम व वनपाल संभाजी गायकवाड यांना माहिती दिली. रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत या बछड्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा बछडा उसामध्ये गेला.

रेस्क्यू टीमने शोधकार्य सुरू केल्यानंतर काही वेळाने ऊसाच्या शेजारी असलेल्या ओढ्याच्या पाण्यात तो मृतावस्थेत आढळून आला. रेस्क्यू टीमने त्याला बाहेर काढले. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत त्याचे शवविच्छेदन केले.
हा मादी बछडा होता, त्याचा एक पाय मोडलेला होता. तसेच त्याच्या शरीरात कुठलेही अन्नघटक मिळून आले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू उपासमारीने झाला. अवसरी वन उद्यान येथे त्याचे अग्नीदहन करण्यात आल्याचे वनपाल संभाजी गायकवाड यांनी सांगितले.

Back to top button