पुणे :  डझनावारी नेत्यांनी पिंजून काढली कसबा पेठ | पुढारी

पुणे :  डझनावारी नेत्यांनी पिंजून काढली कसबा पेठ

ज्ञानेश्वर बिजले : 

पुणे :  केंद्रीय गृहमंत्री, माजी संरक्षणमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह अनेक राज्यस्तरीय नेत्यांनी केवळ एका पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी कसबा पेठ मतदारसंघ पिंजून काढला. कसबा पेठ मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपमध्ये उमेदवार निवडीवरून प्रारंभी झालेला गोंधळ आणि महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय. यामुळे निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता पहिल्यापासूनच बळावली. पुण्यात भाजपचा पराभव केल्यास त्याचे परिणाम राज्यभर उमटू शकतात, हे लक्षात घेत आघाडीच्या नेत्यांनी कसबा पेठेत ताकद पणाला लावली. दुसर्‍या बाजूला भाजपनेही मतदारसंघ मोठ्या मताधिक्याने जिंकण्याचा निश्चय करीत संपूर्ण संघटनात्मक यंत्रणा येथे कामाला लावली. भाजपने हेमंत रासने आणि महाविकास आघाडीने काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. या दोघांतच मुख्य लढत होत आहे.

दोन्ही पक्षांनी राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या केलेल्या या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दिग्गज नेते आल्याने पुण्यातील राजकीय वातावरण तापले. त्यामध्येच सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या भवितव्याबाबतची सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला. या घटनांचे पडसादही प्रचारात दिसले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारात थेट भाग घेतला नसला, तरी या काळात त्यांनी पुण्यात पुस्तक प्रकाशनानिमित्त भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मतदारसंघातील मंदिरात पूजा केली आणि आजारी असलेले खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. बापट यांनीही आजारी असताना कार्यकर्त्यांची बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनेकवेळा भेटी देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. गुरुवारी प्रचार रॅलीही काढली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही मतदारसंघांत वारंवार भेटी देऊन विविध मेळावे घेतले. शिंदे यांनी प्रमुख लोकांच्या भेटी घेतल्याची कार्यकर्त्यांत चर्चा आहे. कसबा पेठ मतदारसंघात त्यांनी प्रचार फेरी काढत शुक्रवारी सांगता सभा घेतली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेही मतदारसंघात तळ ठोकून आहेत. त्यांच्यासमवेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेते प्रचाराची धुरा सांभाळत होते.

महाविकास आघाडीच्या वतीने तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यांचे उमेदवार धंगेकर हे स्थानिक भागात लोकप्रिय आहेत. त्यातच शिवसेना व मनसे या पक्षातून ते सहा वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झाले असून, दोन निवडणुकांत झालेल्या पराभवामुळे त्यांच्याबाबत थोडीफार सहानुभूतीही आहे. तिन्ही पक्षांतील अंतर्गत कुरबुरी मिटविण्यावर वरिष्ठ नेत्यांनी भर दिला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेत प्रचाराची दिशा ठरवली. रॅली काढून तसेच प्रचार सभा घेऊन त्यांनी आघाडीतील एकसंधपणा वाढविला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी प्रथमच या मतदारसंघात तीन मेळावे घेतले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अन्य नेतेही प्रचारात हिरिरीने उतरले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पहिल्यापासूनच निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी पक्षाची प्रचाराची रणनीती आखली. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासमवेत सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या तीन माजी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. बाळासाहेब थोरात, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक आमदार प्रचारात उतरले. शिवसेनेचे (ठाकरे गट) युवानेते आदित्य ठाकरे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, डॉ. नीलम गोर्‍हे, सुषमा अंधारे यांनीही प्रचार सभा घेतल्या. ठाकरे यांच्या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

 

Back to top button