पुणे : आरटीई नोंदणी दोन दिवसांत सुरू | पुढारी

पुणे : आरटीई नोंदणी दोन दिवसांत सुरू

पुणे : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी प्राथमिक शाळांमध्ये राखीव असणार्‍या 25 टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणार्‍या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला येत्या दोन दिवसांत सुरुवात होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत मुलांचे आधार कार्ड स्वीकारण्याबाबतच्या निर्णयावर शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. शिक्षण विभागाकडून सूचना आल्यानंतर, प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली.

आरटीई अंतर्गत राबविण्यात येणार्‍या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांमध्ये उत्सुकता असते. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू व्हावी, अशी पालक आणि संघटनांची मागणी असते. यंदाची प्रवेश प्रक्रिया साधारण 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. मात्र, सरकारी लाभांच्या योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया ही सरकारी योजना असून, याद्वारे मुलांना मोफत प्रवेश मिळतो. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलांचे आधार कार्ड लागण्याची शक्यता आहे.

मात्र, मुलांकडे आधार कार्ड नसल्यास ते प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू शकतात. या पार्श्वभूमीवर मुलांकडे आधार कार्ड नसल्यास, प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल का, आधार कार्ड काढताना मिळणार्‍या पावतीवर प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल का, अशा काही शंकांबाबत शालेय शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. यावर येत्या दोन दिवसांत सूचना प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवसांत प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असेदेखील गोसावी यांनी स्पष्ट केले आहे. पालकांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या माहितीसाठी आणि कागदपत्रांसाठी https:// student. maharashtra. gov. in या वेबसाइटवर संपर्क साधण्याचे आवाहन गोसावी यांनी केले आहे.

Back to top button