पुणे : रेल्वे आणि वाहतूक पोलिसांत ‘प्रीपेड’ वॉर; दोघांच्या भांडणात प्रवाशांचे हाल | पुढारी

पुणे : रेल्वे आणि वाहतूक पोलिसांत ‘प्रीपेड’ वॉर; दोघांच्या भांडणात प्रवाशांचे हाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्थानक परिसरात बंद पडलेले प्रीपेड रिक्षा बूथ सुरू करण्यावरून रेल्वे प्रशासन आणि वाहतूक पोलिस यांच्यात ‘प्रीपेड’ वॉर सुरू आहे. या वादात येथील बूथ काही केल्या सुरू होण्याचे नाव घेत नसून, प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.
पुणे रेल्वे स्टेशनवर येणार्‍या प्रवाशांची रिक्षाचालकांकडून सातत्याने आर्थिक लुटमार होत असते.

ती रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन, वाहतूक पोलिस आणि पुणे आरटीओ यांनी एकत्रित येत येथे अनेक वर्षांपूर्वी ’प्रीपेड रिक्षा’ बुथ उभारला. त्याच्या माध्यमातून प्रवाशांना 24 तास लुटमार न होता रिक्षाची सुविधा मिळत होती. मात्र, येथे सातत्याने होत असलेले वादविवाद, यामुळे कित्येक वेळा सुरू झालेला हा बुथ बंद पडला. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातून रिक्षाचालकांची लूट अजूनही सुरूच आहे.

तर रात्रीच्यावेळी येथून रिक्षातून प्रवास करणेसुध्दा धोकादायक बनले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस आणि रेल्वे प्रशासनाने एकत्रित येऊन ’लेटर वॉर’ बंद करून हा बुथ पुन्हा सुरू करावा. याकरिता संयुक्त बैठक घ्यावी, तरच हा बुथ सुरू करण्याला हिरवा झेंडा मिळेल आणि प्रवाशांचे होणारे हाल संपतील, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

रेल्वे प्रशासन म्हणते…
पुणे रेल्वे स्टेशनवरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या ठिकाणी उभ्या असलेल्या रिक्षाचालकांकडून मीटरपेक्षा जास्त भाडे आकारल्याच्या अनेक तक्रारी रेल्वेला येत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने वाहतूक पोलिसांकडे संपर्क करून प्रीपेड रिक्षा सुरू करण्याची मागणी दोन महिन्यांपासून केली आहे. सुरुवातीला जी 20 परिषद झाल्यानंतर पाहू, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर अनेकदा पाठपुरावा करूनही अद्याप हा बुथ सुरू झालेला नाही.

रेल्वेला आम्ही ‘प्रीपेड रिक्षा’ बूथसाठी दर्शनी भागात जागा मागितली आहे. मात्र, रेल्वे प्रशासन एका कोपर्‍यात जागा देत आहे. कोपर्‍यात प्रीपेड रिक्षा बूथला अजिबात प्रतिसाद मिळत नाही. दर्शनी भागात जागा मिळाल्यास प्रवाशांनाही ते सोयीचे होईल. जागा मिळाल्यास आम्ही लगेचच आरटीओसोबत येथे बूथ सुरू करू.

                                              – विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त,
                                                    वाहतूक शाखा, पुणे शहर.

Back to top button