पुणे : मुलाला खांद्यावर घेऊन धरणाच्या पाण्यात उतरणे पडले महागात; चिमुकल्याचा मृत्यू | पुढारी

पुणे : मुलाला खांद्यावर घेऊन धरणाच्या पाण्यात उतरणे पडले महागात; चिमुकल्याचा मृत्यू

नारायणगाव (पुणे); पुढारी वृत्तसेवा : मुलाला खांद्यावर घेऊन धरणातील पाण्यात उतरलेल्या बापाचा पाय घसरून खांद्यावरील मुलगा पाण्यात पडला. या घटनेत मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. १८) दुपारी २.३० वा. येडगाव धरणाजवळ घडली.

नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी याबाबत माहिती दिली. इशान अखिल कढी (वय ५) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबतची खबर डॉ. राजेंद्र धांडे (वय ४८, रा. आळेफाटा, ता. जुन्नर) यांनी दिली. शनिवारी सकाळी १०:०० वाजण्याच्या दरम्यान डॉ. धांडे यांचे मित्र अखिल कढी (रा. ५०४ बी, अल्फा बिल्डिंग, मेघविहान सोसायटी, पंढरीनगर, हांडेवाडी चौक, पुणे) हे पत्नी निकिता, मुलगा इशान तसेच मित्र किशोर विराट व त्यांची पत्नी, मुलगी, मित्र कुणाल लाहोरे व त्यांची पत्नी अंकिता, मुलगा अव्यश असे नारायणगाव येथे आले. धांडे यांनी फोनवर बोलून त्यांना आपणास येडगाव धरणावर जायचे आहे, असे सांगितल्यानंतर त्यांचे मित्र येडगाव धरणावर आले.

धांडे हे आळेफाटा येथून येडगाव धरणावर पोहोचले. सर्वांनी तेथे एकत्र जेवण केले. धरणाच्या कडेला पाण्याचा आनंद घेत असताना अखिल कढी हे यांनी मुलगा इशान यास खांद्यावर घेऊन पाण्यात गेले. मात्र, पाण्यातील दगडाचा अंदाज न आल्याने त्यांचा पाय घसरून ते होलपटले आणि त्यांच्या खांद्यावरील इशान हा तोल जाऊन पाण्यात पडला व बुडाला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता, तो सापडला नाही. दरम्यान सर्व कुटुंबीयांनी आरडाओरडा केला तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी इशानला शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो मिळून आला नाही.

लोकांनी मासेमारी करणाऱ्यांना बोलावून त्यांच्या मदतीने पाण्यात बुडी मारून इशानला बाहेर काढले. त्यास खाजगी गाडीत घालून नारायणगावातील सरकारी दवाखान्यात आणले असता, तेथील डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

अधिक वाचा :

Back to top button