थंडीमुळे दौंड तालुक्यात कांद्याचे पीक जोमदार | पुढारी

थंडीमुळे दौंड तालुक्यात कांद्याचे पीक जोमदार

पाटस; पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यात थंडीचा जोर वाढू लागल्याने कांदा पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. तसेच थंडीमुळे रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने पीक जोमदार आले आहे. तालुक्यात एकूण 6 हजार 655 हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे.

पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने यावर्षी पाणीसाठाही मुबलक उपलब्ध आहे. त्यामुळे दौंड तालुक्यातील पाटस, गार, पडवी, माळवाडी, कुसेगाव भागांतील अनेक शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या थंडीमुळे कांद्याला पोषक वातवरण लाभले आहे. त्यामुळे कांदा पिके चांगलीच बहरली आहेत.

पिकाला चांगले पाणीदेखील उपलब्ध होत आहे. तर दररोज थंडी वाढत असून, कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे यंदा कांद्याच्या उत्पादनातही मोठी वाढ होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र, बाजारभाव काय मिळतो, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

पाटस परिसरात सर्वाधिक लागवड
पाटस 1 हजार 552 हेक्टर, दौंड 121 हेक्टर, गिरीम 157 हेक्टर, देऊळगाव राजे 273 हेक्टर, मलठण 357 हेक्टर, रावणगाव 536 हेक्टर, वरवंड 858 हेक्टर, कुरकुंभ 390 हेक्टर, यवत 292 हेक्टर, बोरिभडक 395 हेक्टर, खामगाव 146 हेक्टर, बोरीपार्धी 271 हेक्टर, राहू 377 हेक्टर, पारगाव 390 हेक्टर, वडगाव बांडे 401 हेक्टर, केडगाव 139 हेक्टर अशा एकूण 6 हजार 655 हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली असल्याची माहिती दौंड तालुका कृषी अधिकारी देवेंद्र राहुलवाड यांनी दिली.

लागवडीला एकरी 24 हजार 167 हजारांचा खर्च
कुसेगाव-भोसलेवाडी येथील शेतकरी नटराज शांताराम भोसले यांनी 6 एकर कांदा पिकाची लागवड केली आहे. लागवड, मजुरी, खते असा एकूण 1 लाख 45 हजार रुपये खर्च त्यांना आला. एका एकरमध्ये 300 गोणी कांदा निघणार आहे. बाजारभाव कोसळला, तर कमीत कमी 7 लाख रुपये, तर बाजारभाव वाढला तर जास्तीत जास्त 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला आहे.

Back to top button