पिंपरी : मणक्याच्या एक्सरेसाठी रुग्णांची पायपीट ; वायसीएम मधील एक्सरे मशीन बंद | पुढारी

पिंपरी : मणक्याच्या एक्सरेसाठी रुग्णांची पायपीट ; वायसीएम मधील एक्सरे मशीन बंद

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील एक्सरे मशीन गेल्या महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे मणक्यांच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांना खासगी रूग्णालयांमध्ये जाऊन एक्सरे काढावे लागत आहेत. परिणामी रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नाहक आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कामगार नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सत्तावीस लाख लोखसंख्येसाठी महापालिके अंतर्गत पिंपरी येथे यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाची (वायसीएम) स्थापना करण्यात आली. मात्र येथील अद्ययावत एक्सरे मशीन ज्यामध्ये पाठीच्या मणक्यांचे एक्सरे काढले जातात हि मशीन महिनाभरापासून बंद अवस्थेत आहे.

शहरात दुचाकी चालकांची संख्या अधिक आहे. तसेच खड्यांच्या समस्येने नागरिक त्रस्त असून, अपघातांचे प्रमाण अधिक वाढले आहे. परिणामी नागरिकांचे कंबरेचे, पाठीच्या मणक्याचे दुखणे बळावले आहे. त्यामुळे एक्सरे काढण्यासाठी वायसीएम मध्ये गेलेल्या रूग्णांना एक्सरे मशीन बंद असल्याने खासगी रूग्णालयाची वाट धरावी लागत आहे. दोनशे रूपयांऐवजी एक हजार ते दीड हजार रूपयांनी रूग्णांचा खिसा कापला जात आहे.

रूग्णालयातील एक्सरे मशीन त्वरीत सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. याबाबत आप पक्षाचे प्रशासकीय प्रमुख यल्लापा वाळदोर यांनी वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांना निवेदन दिले. सदर बातमीबाबत माहितीसाठी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

दुरुस्तीसाठी चेन्नई येथून अभियंता
पाठीच्या मणक्यांच्या एक्सरेसाठी अद्ययावत असलेली एक्सरे मशीन महिनाभरापासून बंद आहे. ही मशीन परदेशामधून आणलेली असून, 13 वर्षापासून वापरात आहे. मशीनच्या दुरूस्तीसाठी परदेशामधून साहित्याची आयात करावी लागत आहे. तसेच चेन्नई येथून दुरुस्तीसाठी अभियंत्याना बोलावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Back to top button