पुणे रेल्वे स्टेशन होणार अत्याधुनिक; नवीन सात मजली इमारतीचा प्रस्ताव | पुढारी

पुणे रेल्वे स्टेशन होणार अत्याधुनिक; नवीन सात मजली इमारतीचा प्रस्ताव

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आगामी काळात पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यात येणार आहे. या स्थानकाची नवीन इमारत आता सात मजली असेल. अत्याधुनिक सोयी-सुविधांनी ती परिपूर्ण असणार आहे. प्रवाशांसाठी येथे अलिशान वेटिंग रूमसह या इमारतीत वाहन पार्किंगची उपलब्ध असणार आहे.

केंद्र सरकारने देशातील काही रेल्वे स्थानकांचा विकास करण्याचे नियोजन केले आहे. त्यात पुणे रेल्वे स्थानकाचा प्रस्ताव पुणे विभागातील अधिकार्‍यांनी रेल्वे बोर्डाला पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास पुणे स्थानकाचा आगामी काळात विकास होणार आहे. प्रशासनाने हा प्रस्ताव तयार करताना त्यासाठी लागणारा खर्च, जागा यासह नवीन इमारतीचे संकल्पचित्रसुध्दा तयार केले आहे. या इमारतीसाठी सुमारे 500 ते 1 हजार कोटी रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. नवीन रेल्वे स्थानक उभारण्याचे काम रेल्वे प्रशासनाने ’रेल्वे लँड डेव्हलपमेंट अ‍ॅथोरिटी’ला (आरएलडीए) म्हणजेच रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाला दिले जाणार आहे.

एसटी स्थानकाचे होणार स्थलांतर
जुनी इमारत न हलविता शेजारील जागेत रेल्वे प्रशासनाचे नवीन इमारत उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासन बाजूलाच असलेला पार्सल विभाग, आरपीएफ चौकी, आरपीएफची अन्य कार्यालयांसह येथे असलेले एसटी स्थानकाचेदेखील आगामी काळात स्थलांतर करणार आहे.

जुनी हेरिटेज इमारत तशीच राहणार…
पुणे रेल्वे स्थानकाची इमारत इंग्रजांच्या काळात उभारण्यात आली आहे. ही इमारत इंग्रज वास्तुविशारद जेम्स बरकली यांनी त्या वेळी अवघ्या सहा हजार रुपयांत उभारली होती. या इमारतीला आता हेरिटेज दर्जा आहे. त्यामुळे ही इमारत न हलविता रेल्वे प्रशासन बाजूलाच असलेल्या जागेत ही अत्याधुनिक नवीन इमारत उभारणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकाचा विकास करण्याचे नियोजन आहे. रेल्वे स्थानकाच्या जुन्या इमारतीच्या बाजूलाच नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आम्ही रेल्वे बोर्डाला पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाली आणि निधी मिळाल्यास या स्थानकाच्या विकासकामाला सुरुवात करण्यात येईल.

 – डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे, पुणे विभाग

Back to top button