वेल्हे : मोकाट कुत्र्यांसह जनावरांचा धुमाकूळ | पुढारी

वेल्हे : मोकाट कुत्र्यांसह जनावरांचा धुमाकूळ

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : वर्षभरापासून पानशेत (ता.वेल्हे) व आंबी (ता.हवेली) भागात मोकाट कुत्र्यांसह जनावरांचा धुमाकूळ सुरू आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात विद्यार्थ्यांसह नागरिक जायबंदी झाले आहेत. मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे भाजीपाल्यासह उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. मात्र, यंत्रणा नसल्याने स्थानिक प्रशासन हतबल झाले आहे.

पानशेत, वांजळवाडी, कुरण खुर्द, आंबी, रानवडी, कादवे भागात 40-50 गाई, बैल, वासरे अशा मोकाट जनावरांचा कळप धुमाकूळ घालत आहे. पावसाळा संपल्याने रानात ओला चारा मिळत नाही, त्यामुळे मोकाट जनावरे थेट ज्वारी, गहू, भाजीपाला अशी पिके रातोरात फस्त करत आहेत. मोकाट जनावरे दिवसा घनदाट जंगलात आसरा घेतात आणि रात्री बाहेर पडतात. शेतकर्‍यांचा सुगावा लागताच क्षणात पसार होतात.

त्यामुळे शेतकर्‍यांना पिकांची राखण करण्यासाठी रात्रभर धावपळ करावी लागत आहे. मोकाट जनावरांनी बांधावरील पावटा, शेतातील मका, ज्वारी, कडधान्याची पिके टोळधाडीसारखी फस्त केली आहेत. अनेक शेतकर्‍यांनी मोकाट जनावरांमुळे शेती करणे बंद केले आहे, असे आंबी येथील शेतकरी शंकरराव निवंगुणे यांनी सांगितले.

पानशेत-सिंहगड भागात पाच-सहा महिन्यांत शंभराहून अधिक मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट सुरू आहे. मोकाट कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णांची संख्या महिनाभरात शंभराहून अधिक झाली आहे. वेल्हे, हवेली व मुळशी तालुक्यातील रुग्ण आहेत. गंभीर रुग्णांना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात येते. आरोग्य विभागाने पानशेत, खानापूर येथील आरोग्य केंद्रांत रेबीज लसीचा साठा उपलब्ध केला आहे.

निसर्ग, रोगांचा प्रादुर्भावापेक्षा मोकाट जनावरांचे शेतीवर नवीन संकट उभे आहे. मोकाट गाई, बैल शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करत आहेत. वन, कृषी, महसूल व पोलिस प्रशासनाने समन्वय साधून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.

                                                     मंगल निवंगुणे, सरपंच, आंबी.

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेले दररोज चार ते पाच रुग्ण येतात. गेल्या पाच-सहा महिन्यांत अशा रुग्णांत वाढ झाली आहे.

                                                             डॉ. स्वागत रिंढे,
                                     वैद्यकीय अधिकारी, खानापूर आरोग्य केंद्र.

Back to top button