पुणे : इंद्रायणी मेडिसिटीची केवळ घोषणाच! | पुढारी

पुणे : इंद्रायणी मेडिसिटीची केवळ घोषणाच!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : घोषणा होते परंतु, त्याची अंमलबजावणी रखडते हे सरकारी योजनांसाठी काही नवीन नाही. तेच घडले आहे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी घोषणा केलेल्या इंद्रायणी मेडिसिटीबाबत. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या गतवर्षीच्या अर्थसंकल्पात इंद्रायणी मेडिसिटीची केवळ घोषणा केली. त्यासाठी निधीची तरतूद मात्र अद्यापपर्यंत झालेली नाही. अजूनही जागा निश्चित झालेली नाही. परिणामी, इंद्रायणी मेडिसिटीची केवळ घोषणाच ठरलेली आहे.

विविध प्रकारच्या आजारांचे अद्ययावत उपचार एकाच छताखाली देण्यासाठी गुडगाव- दिल्ली, कर्नाटक, अहमदाबादच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रासाठी इंद्रायणी मेडिसिटी उभारली जाणार आहे. या अंतर्गत सुमारे तीनशे एकरहून अधिक जागेत विविध प्रकारच्या आजारांसाठी 24 विभागांच्या स्वतंत्र इमारती निर्माण केल्या जाणार असून, पुण्याजवळील चाकण, खेड किंवा आळंदी यापैकी एका ठिकाणी या मेडिसिटीसाठी जागांची चाचपणी केली जात आहे.

परंतु, काही दिवसांपासूर्वी मेडिसिटी थेट पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये करण्यासंदर्भातदेखील एका बैठकीमध्ये चर्चा झाली. मात्र, तसे झाले तर ग्रामीण भागातील रुग्णांना पुन्हा पुण्यातच उपचारासाठी यावे लागणार आहे. याबाबत एका अधिकार्‍यांनी सांगितले. आतापर्यंत केवळ बैठकाच सुरू असून, निधी नसल्याने काहीच निश्चित झालेले नाही.

पुणे जिल्हा परिषदेकडे इंद्रायणी मेडिसिटीचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी होती. मेडिसिटीची घोषणा झाल्यानंतर तीनशे एकर जागेची जबाबदारी महसूल विभाग आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) देण्यात आली आहे. तर इंद्रायणी मेडिसिटी उभारण्याचे कामही पीएमआरडीएकडे सोपविण्यात आले. दरम्यान, शासनाच्या मालकीची तीनशे एकर अशी कोणतीही जागा खेड परिसरात उपलब्ध नाही. त्यामुळे एवढी मोठी जागा घेण्यासाठी भूसंपादनासाठी मोठा खर्च होणार आहे.

काय असेल मेडिसिटीमध्ये…
इंद्रायणी मेडिसिटीमध्ये अवयव प्रत्यारोपण, मेंदूरोग, दंतचिकित्सा, बालरोग, नेत्ररोग, एंडोक्रायनोलॉजी, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, मूत्ररोग, हिमॅटोलॉजी, आयूष जनरल रुग्णालय, ट्रॉमा क्रिटिकल, हृदयरोग, मूत्रपिंड, मानसिक पुनर्वसन केंद्र, स्त्रीरोग, रेडिओलॉजी, पुनर्वसन केंद्र, स्पोर्ट्स मेडिसीन, कॅन्सर आदी शाखांच्या 24 स्वतंत्र रुग्णालयांचा समावेश असेल. संशोधनाला चालना देण्यासाठी क्लिनिकल रिसर्च सेंटर, जेनेटिक मेडिसीन रिसर्च सेंटर, ओबेसिटी अँड डाएट मॅनेजमेंट, जीन्स बँक, रक्तपेढी, मेडिकल लायब—री डेटा सेंटर, स्टेम सेल अशा रुग्णालयांशी अन्य परस्परपूरक संस्थाही उभारल्या जाणार आहेत.

Back to top button