पुणे : सिंहगड रस्त्यावर ‘गर्दी’चा उलटा प्रवास | पुढारी

पुणे : सिंहगड रस्त्यावर ‘गर्दी’चा उलटा प्रवास

हिरा सरवदे

पुणे : नरवीर तानाजी मालुसरे रस्त्याला (सिंहगड रस्ता) पर्याय म्हणून महापालिकेने तयार केलेल्या कालव्यालगतच्या पर्यायी रस्त्याला नागरिकांकडून पसंती मिळत आहे. मात्र, हा रस्ता सिंहगड रस्त्याला जिथे मिळतो तिथे चौक किंवा वाहतूक बेट नसल्याने वाहनचालक पु. ल. देशपांडे उद्यान चौकापर्यंतचा वळसा टाळण्यासाठी गणेशमळा चौकापर्यंत उलटा प्रवास करतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पर्वती पायथ्याजवळ वाहतूक कोंडी होत आहे, त्यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

हिंगणे, सनसिटी, वडगाव, धायरी, नर्‍हे भागासह खडकवासला, खानापूर-पानशेत परिसरात नागरीकरण वाढत आहे. या भागातील नागरिकांना पुण्यात ये-जा करण्यासाठी सिंहगड रस्त्याचा वापर करावा लागतो. सिंहगड रस्त्याला समांतर असा विश्रांतीनगर ते वडगाव असा रस्ता काही वर्षांपूर्वी करण्यात आला. मात्र, विठ्ठलवाडी ते दांडेकर पुलापर्यंत हा समांतर रस्ता नसल्याने मुख्य सिंहगड रस्त्यावरच अवलंबून राहावे लागते आणि त्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी होत होती, यामुळे जनता वसाहतीजवळील कालव्यावरील रस्ता सिंहगड रस्त्याला जोडण्यासाठी नवा साडेसात मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी या रस्त्याचा वापर आता पुणेकर मोठ्या प्रमाणावर करीत आहेत.

नागरिकांना सिंहगड रस्त्याला पर्याय मिळालेला असला, तरी त्यामुळे काही नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. पर्वती पायथा येथे वाहतूक कोंडी होत आहे. नीलायम चित्रपटगृहाजवळून सहकारनगरला तसेच जनता वसाहतीत जाणारे, सहकारनगरहून येणारे तसेच जनता वसाहतीकडे जाणारे, अशा तीनही मार्गांवरील वाहनचालकांची एकाच चौकात गर्दी होत आहे. दुसरे म्हणजे कालव्यालगतचा रस्ता सिंहगड रस्त्याला ज्या ठिकाणी मिळतो, तेथे चौक नसल्याने अनेक वाहने गणेशमळा चौकापर्यंत उलट्या दिशेने येतात आणि स्वारगेट किंवा दत्तवाडीकडे जातात. त्यातच या रस्त्यावर पदपथ सोडून अनेक विक्रेते व्यवसाय थाटून बसतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सारसबाग चौकापर्यंत रस्त्याची मागणी
कालव्यालगत करण्यात आलेला रस्ता जनता वसाहत येथून कालव्याच्या भरावावरून पुढे सावरकर पुतळ्याच्या पाठीमागून सारसबाग चौकात आणण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली होती. मात्र, जनता वसाहत येथून पुढे भूमिगत कालव्यावर अतिक्रमण झाले आहे. दुसरा कालवा वाहता असतो; त्यामुळे वाहत्या कालव्याच्या भरावावरून रस्ता करणे धोक्याचे आहे. शिवाय, त्याला जलसंपदा विभागाकडून परवानगीही मिळू शकत नाही, त्यामुळे सारसबाग चौकापर्यंत रस्ता होणे शक्य नसल्याचे पथ विभागाच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

वाहनचालकांनी उलट्या दिशेने येऊ नये किंवा त्यांच्यावर पु. ल. देशपांडे उद्यानाकडे जाऊन वळसा मारण्याची वेळ येऊ नये, यासाठी चौक किंवा बेट तयार करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले असूनही मिळालेले नाही. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर एनओसी देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

                                       – व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभागप्रमुख, महापालिका

Back to top button