पुणे : शिर्सुफळ बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती | पुढारी

पुणे : शिर्सुफळ बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती

उंडवडी : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील म्हेत्रेवस्ती हद्दीत असलेल्या ओढ्यावरील बंधार्‍यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असून, लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सध्या या भागात पाणीटंचाई जाणवू लागली असून, बंधार्‍याची दुरुस्ती झाली नाही तर तीव्र पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर या बंधार्‍याची दुरुस्ती करून पाणीगळती थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सहा वर्षांपूर्वी शिर्सुफळ येथील म्हेत्रेवस्ती हद्दीत असलेल्या ओढ्यावर बंधारा बांधण्यात आला. यंदा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे बंधारा तुडुंब भरला. परिणामी, यंदा शेतकर्‍यांनी जनावरांच्या चार्‍यासह इतर नगदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली. परंतु, आता याच बंधार्‍याला ठिकठिकाणी पाण्याची गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून, बंधार्‍याची पाणीपातळी दिवसेंदिवस झपाट्याने खालावत आहे. जर अशीच पाणीगळती होत राहिली, तर उन्हाळ्यात तीव— पाणीटंचाई निर्माण होणार आहे. तसेच, येथील शेतीला पाणी कमी पडून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही गंभीर होणार असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. या बंधार्‍याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

 

Back to top button