पुणेकरांवरील कराचा बोजा वाढणार ; 11 टक्के करवाढ प्रस्तावित | पुढारी

पुणेकरांवरील कराचा बोजा वाढणार ; 11 टक्के करवाढ प्रस्तावित

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात प्रशासनाकडून 11 टक्के करवाढ प्रस्तावित करण्यात आल्याने पुणेकरांवरील कराचा बोजा वाढणार आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय महापालिका प्रशासक व आयुक्त विक्रम कुमार घेणार आहेत.
महापालिका प्रशासनाकडून दरवर्षीच्या अंदाजपत्रकात मिळकतकरात वाढ प्रस्तावित केली जाते. मात्र, स्थायी समितीकडून ही करवाढ फेटाळली जाते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत करात कोणतीही वाढ झाली नाही. मात्र, मागील वर्षी मार्च 2022 मध्ये सभागृहाची मुदत संपल्याने महापालिकेत प्रशासक राज आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाने मिळकतकरात सरासरी 11 ते 15 टक्के दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. यावर आयुक्त अंतिम निर्णय घेणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

एका बाजूला महापालिकेचे हजारो कोटींचे प्रकल्प सुरू असताना आणि दुसर्‍या बाजूला 2023-24 या वर्षाच्या अंदाजपत्रकात प्रशासनाने तब्बल दोन ते अडीच हजार कोटींच्या प्रकल्पांचे खर्चाचे दायित्व स्वीकारल्याने महापालिकेस उत्पन्नाची गरज आहे. परिणामी, प्रशासन करवाढीबाबत सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. महापालिका प्रशासन करवाढ करण्याच्या तयारीत असले, तरी आगामी महापालिका निवडणूक आणि आधीच 40 टक्के निवासी मिळकतीची सवलत रद्द केल्याने उडालेल्या गोंधळामुळे कोणत्याही स्थितीत मिळकतकर वाढ करू नये, अशा सूचना वरिष्ठ पातळीवरून महापालिका प्रशासनास देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून मिळकतकर वाढीबाबत सावध भूमिका घेत आहे.

Back to top button