पिंपरी : पोटाची भूक उठली जीवावर; सिग्नलवर मुलांकडून धोकादायक पद्धतीने वस्तूंची विक्री | पुढारी

पिंपरी : पोटाची भूक उठली जीवावर; सिग्नलवर मुलांकडून धोकादायक पद्धतीने वस्तूंची विक्री

वर्षा कांबळे

पिंपरी : सिग्नल लागला की, वाहनांच्या गर्दीतून वाट काढत काही वस्तू विकणारी छोटी मुले दिसून येतात. शहरातील अनेक चौकात हे चित्र दिसून येते. पोटाची भूक भागविण्यासाठी पालकच आपल्या मुलांना वाहनांच्या गर्दीत वस्तू विक्रीसाठी अथवा भीक मागण्यासाठी सोडतात. हे पालकच या मुलांच्या जीवावर उठले आहेत. याकडे पोलिस व बालकल्याण विभागदेखील लक्ष देत नसल्याने या बेजबाबदार पालकांचे फावते आहे.

शिक्षण घेण्याच्या आणि खेळण्या- बागडण्याच्या वयात धोकादायक पद्धतीने वाहनांमधून आपल्याला काम करण्यास भाग पाडले जाते, याचा विचारही त्यांच्या निरागस मनात येत नाही. ज्या वयात मुलांना शिक्षण द्यायला पाहिजे, तिथे आज आपण पाहतो कित्येक मुले कमी वयात कामाला जुंपली जातात. गरिबीमुळे, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक मुलांना अशा पद्धतीने काम करावे लागते. त्यामुळे, अनेक मुले प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहतात. शहरातील अनेक चौकांमध्ये हे चित्र दिसत आहे.

शहरातील चौकात परप्रांतीय कुटुंबे कित्येक वर्षापासून सिग्नलवर वस्तू विकत आहेत. यामध्ये डस्टबिनाच्या पिशव्या, बॅग, पेन, शोपीस, फुगे, क्लीनर, खेळणी यांसारख्या वस्तूंची विक्री केली जाते. पूर्वी मोठी माणसे या वस्तू विकताना दिसत होती. हल्ली अगदी चार ते पाच वयाची मुलेदेखील हातात वस्तू घेऊन सिग्नलच्या ठिकाणी वाहनांच्या गर्दीमधून वाहनचालकांना वस्तू खरेदी करण्याची केविलवाणी विनवणी करताना दिसतात. सिग्नल सुटला की, रस्त्याच्या कडेला जावून थांंबायचे अशा प्रकारे जीवावर उदार होऊन ही मुले वस्तू विकताना आढळून येत आहेत. याबाबत अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याशी संपर्क केला असता तो होवू शकला नाही.

अपघाताची नाही भीती
सिग्नल सुटल्यानंतर वाहनचालकांना गर्दीमध्ये फिरणारी मुले पाहून वाहने सावकाश चालवावी लागतात. यामध्ये बेदरकारपणे वाहने चालविणारे चालकदेखील असतात. तसेच बस, टेम्पो अवजड वाहनेदेखील असतात. एखाद्या वाहन चालकाच्या नजरचुकीने मुलांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही; तसेच त्यांचे पालकही याबाबत बेफिकीर असल्याचे दिसून येते. मुलांना दररोज मरणाच्या दारात सोडून हे पालक स्वत: रस्त्याच्या कडेला थांबतात. मुलांनादेखील अपघाताची भीती नसल्याने बिनदिक्कतपणे वाहनांच्या गर्दीतून फिरत असतात.

सिग्नलवर वस्तू विकणार्‍या मुलांकडून वस्तू विकत घेतली नाही, तरी भावनेच्या आहारी जाऊन लोक पैसे देतात. त्यामुळे त्यांचे पालक मुलांना सिग्नलवर वस्तू विकायला लावतात. परंतु लहान मुलांकडून काम करवून घेणे अथवा त्यांना पैसे मागायला लावणे हा गुन्हा आहे. त्यामुळे यावर लक्ष देऊन प्रशासनाने कडक कारवाई करणे जरूरी आहे. तसेच या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

                                    – प्राजक्ता रुद्रवार (अध्यक्षा, सहगामी)

Back to top button