नसरापूर : सावकारांनी पुन्हा काढले डोके वर | पुढारी

नसरापूर : सावकारांनी पुन्हा काढले डोके वर

माणिक पवार

नसरापूर : राज्याचे तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी सावकारी कायदा आणल्याने त्यावेळी काही प्रमाणात सावकारांवर कारवाईही करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील सावकारी काही प्रमाणात आटोक्यात आली असली, तरी आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर या सावकारांनी पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र आहे. भोर, वेल्हा व मुळशी तालुक्यांत फंडगट, बचतगट, भिशी या माध्यमांतून सावकारांनी कोट्यवधी रुपयांचा ब्लॅकमनी भरमसाठ व्याजाने अनेकांना दिला असल्याचे समजते.

तालुक्यात छोटे व्यापारी, भाजी विक्रेते, कामगार, मजूर यांच्या गळ्याभोवती खासगी सावकारीचा पाश घट्ट होत आहे. मुद्दल रकमेपेक्षा व्याज अधिक घेऊ नये, कोर्‍या स्टॅम्पवर कर्जदाराच्या सह्या घेऊन कर्जवसुलीसाठी धमकी दिली जात असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात होत आहे. शेतकर्‍यांचेच शत्रू असणार्‍या खासगी सावकारांना वेचून काढून तुरुंगात डांबायचे धाडस सरकारने करणे गरजेचे असल्याची चर्चेला उधाण येत आहे.

अनेक सावकारांनी शेतकर्‍यांसह असाहाय्य लोकांच्या जमिनी, घरे, दागिने, वाहने कवडीमोलाने घशात घातली आहेत. अडलेल्यांकडून कोरा मुद्रांक, धनादेशांवर सह्या घेऊन 25 ते 30 टक्के व्याजाने पैसे दिले जात आहेत. त्याचे पठाणी पद्धतीने व्याजही वसूल करून घेतले जात आहे. पैसे देताना सुरुवातीलाच व्याज कापून घेतले जाते.

त्यानंतर भरमसाठ व्याज वसूल केल्यानंतर जमिनी, घरे, गाड्या जप्त केल्या जात आहेत. काही छोटेसे हॉटेल काढून त्या नावाखाली सावकारी सुरू आहे. सावकारांकडून वसूल केल्या जाणार्‍या पठाणी व्याजामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. अनेकजण सावकारांचा तगादा आणि धमक्यांमुळे बेपत्ता झाले असल्याचे बोलले जात आहेत. अशा सावकारांचा बीमोड करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

…अन्यथा पाच वर्षांची शिक्षा
कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंत दंड यापैकी एक किंवा दोनही प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच परवाना प्राप्त करून घेताना हेतूपुरस्पर व जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती अर्जासोबत सादर केल्यास 2 वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा किंवा 25 हजारांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. तरतुदीपेक्षा जास्त व्याज आकारणी केल्यास प्रथम अपराधास 25 हजारांपर्यंत, तर नंतरच्या अपराधास 50 हजारांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. कर्जाच्या तरतुदीसाठी सावकाराने कर्जदाराचा विनयभंग, छळवणूक केल्यास 2 वर्षांपर्यंत कैद किंवा 5 हजारांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. या नव्या सावकारी कायद्यानुसार विनापरवाना व अवैध सावकारी केल्यास संबंधितांस 5 वर्षांपर्यंत शिक्षा आहे.

Back to top button