पुणे : रुग्णहक्क कायद्याला केराची टोपली; रुग्णहक्क सनद, दरपत्रकाची माहिती प्रदर्शित करण्यास टाळाटाळ | पुढारी

पुणे : रुग्णहक्क कायद्याला केराची टोपली; रुग्णहक्क सनद, दरपत्रकाची माहिती प्रदर्शित करण्यास टाळाटाळ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कायद्यानुसार सर्व खासगी रुग्णालयांनी रुग्णहक्क सनद, दरपत्रक व तक्रार निवारण कक्षाची माहिती दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. गेल्या दोन वर्षांत शहरातील 40 रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत संपूर्ण रुग्णहक्क सनद केवळ 2 रुग्णालयांनी, तर दरपत्रक केवळ 3 रुग्णालयांनी लावल्याची माहिती पुढे आली आहे. ’महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन’ कायद्यानुसार प्रत्येक रुग्णालयाने रुग्ण हक्क सनद, दरपत्रक व तक्रार निवारण कक्षाची माहिती दर्शनी भागात प्रदर्शित करणे कायद्याने बंधनकारक आहे.

’रुग्णहक्क मोहीम’ व ’साथी’ संस्थेच्या वतीने ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 दरम्यान महापालिका कार्यक्षेत्रातील 40 खासगी रुग्णालयांची पाहणी केली. पाहणीतील 34 रुग्णालयांनी महानगरपालिकेकडून दरपत्रक प्रदर्शित करण्याबाबत माहिती मिळाली नसल्याचे सांगितले.
रुग्णहक्क संहिता, दरपत्रक हॉस्पिटलच्या मुख्य दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात न आल्यास संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्याचे महापालिका प्रशासनाला अधिकार आहेत.

जी रुग्णालये, कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत त्यांची नोंदणी निलंबित करावी, अशी मागणी रुग्णहक्क परिषदेत करण्यात आली. यावेळी डॉ. अभय शुक्ला, विनोद शेंडे, दीपक जाधव आदी उपस्थित होते. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे दर असतात. व्यवसाय असल्याने नफा मिळवला जाणारच; मात्र तो किती टक्के मिळवावा हे शासनाने ठरवून द्यायला हवे. सध्याच्या दरपत्रकात इनबिल्ट चार्जेसचा उल्लेख आहे. मात्र, त्यावर नियंत्रण आल्यास रुग्णांची बिलामध्ये 30 ते 40 टक्के बचत होईल; यासाठीदेखील शासनाने कायदा आणायला हवा, अशी मागणी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली.

महापालिका काय करणार?

  • ‘महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट – नियम 2021’ नुसार पुढील 15 दिवसांत तक्रार निवारण कक्षाची स्थापना करावी.
  • तक्रार निवारण कक्ष स्थापन करताना संस्था – संघटनांची सल्लागार समिती स्थापन करावी.
  • पुढील एक महिन्याच्या आत सर्व खासगी हॉस्पिटलना भेट देऊन तपासणी करावी व रुग्ण हक्क सनद, दरपत्रक प्रदर्शित करण्याचे आदेश न पाळणार्‍या हॉस्पिटलवर कारवाई करावी.
  •  माहिती प्रदर्शित करण्याचे आदेश देऊनही तो न पाळणार्‍या हॉस्पिटलची नोंदणी निलंबित करावी.

पाहणीत काय आढळले?

  • 30 रुग्णालयांमधील रुग्णहक्क सनद शासनाच्या सनदेशी सुसंगत नसून अपुरी आहे.
  • पाहणीतील 25 रुग्णालयांनी कायद्यानुसार 15 प्रकारची दरपत्रके न लावता केवळ बेड/वार्ड चार्जेस, प्रयोगशाळा तपासण्यांची दरपत्रके लावली आहेत.
  • पाहणीतील 12 रुग्णालयांनी दरपत्रके, तसेच 8 रुग्णालयांनी रुग्ण हक्क सनद प्रदर्शित केलेली नाही.

रुग्ण हक्क सनद व दरपत्रक प्रत्येक हॉस्पिटलने लावायलाच हवे. या पुढील काळात असोसिएशनचे सदस्य होण्यासाठी हॉस्पिटलने दरपत्रक व सनद लावली का नाही, हा निकष ठेवण्याचा विचार करण्यात येईल.

                        – डॉ. मंजुषा कुलकर्णी, सचिव, हॉस्पिटल असोसिएशन

सध्या तक्रार निवारण कक्ष आरोग्य विभागातल्या जागेअभावी परवाना विभागात स्थापन केला आहे. येत्या पंधरा दिवसात कक्ष आणि आणि टोल फ—ी नंबर कार्यन्वित होईल. पहिल्या टप्पात तक्रारी काय येत आहेत, याची पाहणी करू आणि त्यांच्या निवारणासाठी वैद्यकीय अधिकारी नेमण्याची आवश्यकता असल्यास पुढे त्याबाबतही विचार केला जाईल.

              – डॉ. मनीषा नाईक, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

Back to top button