अट्टल दुचाकीचोर पोलिसांकडून गजाआड; चोरीच्या पाच दुचाकी जप्त | पुढारी

अट्टल दुचाकीचोर पोलिसांकडून गजाआड; चोरीच्या पाच दुचाकी जप्त

मंचर; पुढारी वृत्तसेवा : मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी करणार्‍या दोन चोरट्यांना मंचर पोलिसांनी अटक केली. किरण खंडागळे आणि विजय कडाळे, असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून वारंवार मोटारसायकल चोरीस गेल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या सूचनांनुसार अशा चोऱ्यांवर अंकुश लावण्याच्या दृष्टीने मंचर पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. आता त्याला यश आले आहे.

पोलिसांनी किरण गोविंद खंडागळे आणि विजय अनंता कडाळे (वय 22, रा. जउळके, ठाकरवाडी पारगाव तर्फे खेड, ता. आंबेगाव) यांना अटक केली असून, त्याच्याजवळून 5 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी मंचर आणि खेड परिसरात मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. अजूनही दुचाकीचोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याची माहिती मंचरचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिली.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंचरचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर, सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर, पोलिस जवान गणेश डावखर, संजय नाडेकर, राजेश नलावडे, सोमनाथ वाफगावकर, दिनेश माताडे, योगेश रोडे, अजित पवार, अविनाश दळवी यांनी केली आहे.

Back to top button