पिंपरी: वर्षभरात 153 रुपयांनी वाढला घरगुती गॅस | पुढारी

पिंपरी: वर्षभरात 153 रुपयांनी वाढला घरगुती गॅस

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: गेल्या वर्षभरात घरगुती सिलिंडरच्या किमतीत 153.50 रुपये इतकी भरीव वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींच्या मासिक घरखर्चाच्या बजेटवर त्याचा परिणाम होत आहे. व्यावसायिक गॅसच्या किमतीतही गेल्या वर्षभरात चढ-उतार पाहण्यास मिळाले. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या गॅसच्या दरामध्ये 25 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना त्याचा फटका बसला आहे.

गेल्या वर्षभरामध्ये घरगुती गॅसच्या किमतीमध्ये चार वेळा वाढ झाली. त्यामुळे महिलांच्या मासिक बजेटला धक्का बसला आहे. 2022 मध्ये एप्रिल महिन्यात घरगुती सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली. नंतर मे महिन्यात पुन्हा 53 रुपयाने वाढ झाली. तर जून महिन्यात 56 रुपयांनी सिलिंडरचे दर वाढले. तर, जुलै महिन्यात या दरामध्ये 6 रुपयांनी घट झाली. त्यानुसार, घरगुती सिलिंडरचे दर जुलै महिन्यात 1056 रुपये इतके होते. त्यानंतर, मात्र या दरामध्ये आत्तापर्यंत वाढ झालेली नाही. घरगुती गॅस हा 14.2 किलोमध्ये येतो. गेल्या पूर्ण वर्षभरात एकूण 153.50 रुपयांनी गॅस महागला आहे. सततच्या महागाईमुळे महिला वर्गामध्ये नाराजी दिसून येत आहे.

व्यावसायिक गॅसच्या किमतीतही वाढ

1 जानेवारी 2023 पासून व्यावसायिक गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. ही वाढ प्रतिसिलिंडर 25 रुपयांची आहे. सन 2022 मध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत बर्‍याच प्रमाणात चढ-उतार पाहण्यास मिळाला. गेल्या वर्षाच्या सुरुवातीस काही महिने व्यावसायिक गॅस महाग होता. नंतर काही महिन्यांनी गॅसच्या किमतीत थोडीशी घट झालेली दिसून आली.

Back to top button