पुणे : पाहुण्यांचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत | पुढारी

पुणे : पाहुण्यांचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात दुपारच्या सत्रात पाहुण्यांचे ढोल-ताशे अन् तुतारीच्या निनादात जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागताने ते भारावून गेले. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये विविध देशांच्या प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी केंद्रीय वित्तमंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय आयुक्त सौरभ राव, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपायुक्त वर्षा लढ्ढा आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यापीठात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये कडुनिंब, सोनचाफा, ताम्हण, बकुळ, सप्तपर्णी, मुचकुंद आदी वृक्षांचा समावेश आहे. वृक्षारोपणप्रसंगी काही राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी वृक्षांची माहिती औत्सुक्याने जाणून घेतली.

कलाकारांशी संवाद
विद्यापीठामध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर अतिथी प्रतिनिधींचे चर्चासत्राच्या मुख्य कार्यक्रमासाठी मुख्य इमारत परिसरात आगमन होताच मराठमोळे ढोल- ताशे, तुतारी, लेझीम वाद्यांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. या सुंदर अशा स्वागताने अतिथी भारावून गेले. त्यांनी उपस्थित सर्व कलाकारांचे अभिनंदन केले व काही कलाकारांशी मनमोकळा संवाद साधला. याप्रसंगी कलाकारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काही प्रतिनिधींनी जागीच फेटा बांधून घेतला व अवघ्या काही क्षणात फेटा बांधणार्‍यांचेही कौतुक केले. काहींनी आपल्या मोबाईलमध्येही महाराष्ट्राची सांस्कृतिक छबी उत्साहाने टिपली.

Back to top button