पुणे : म्हाडा सदनिकांच्या कागदपत्रांच्या पडताळणीत बदल | पुढारी

पुणे : म्हाडा सदनिकांच्या कागदपत्रांच्या पडताळणीत बदल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकांच्या सोडत क्षेत्रविकास महामंडळाने (म्हाडा) इंटिग्रेटेड लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम 2.0 या नवीन तंत्रज्ञान प्रणालीद्वारे काढण्यासाठी पुण्याच्या सोडतीतून सुरुवात केली. परंतु, अवघ्या दोन दिवसात या प्रणालीमध्ये त्रुटी असल्याचे दिसून आल्या. त्यामुळे आज्ञावलीत प्रामुख्याने नवीन राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल करत जुने अधिवास प्रमाणपत्र संगणकीकृत करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच इतर कागदपत्रांच्या पडताळणी बाबत संबंधित विभागीय यंत्रणांना देखील कळविण्यात आले आहे, असे म्हाडाकडून सांगण्यात आले.

गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकांची विक्री, अर्ज करण्यापासून ते सदनिकेचा ताबा मिळेपर्यंतची प्रक्रिया आयएलएमएस 2.0 या नूतन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. त्यानुसार प्रचलित पद्धतीला मागे टाकून नवीन प्रणालीनुसार अर्जदारांना अर्ज भरताना छायाचित्र, ई-स्वाक्षरी, शपथपत्र, राष्ट्रीयत्व अधिवास प्रमाणपत्र, स्वीकृतीपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार-पॅनकार्ड आदी सात कागदपत्रे आज्ञावलीनुसार संगणकीकृत केल्याशिवाय अर्जाची प्रक्रिया पूर्ण होणार नसल्याचे निकष टाकण्यात आले. नव्याने घेण्यात आलेल्या निर्णयांनुसार कागदपत्रांची पूर्तता करण्याची आज्ञावली निश्चित करण्यात आली.

परंतु, ज्या नागरिकांनी जुन्या काळात अधिवास प्रमाणपत्र किंवा पॅन कार्ड काढले त्यांबाबत अडचणी निर्माण होत नागरिकांच्या एकाच प्रकारच्या तक्रारी सुरू झाल्या. त्यापार्श्वभूमीवर म्हाडाचेे अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे अभियंते यांची काल बैठक पार पडली, असल्याची माहिती आयएलएमएस प्रणाली तयार करणारे अभियंते जितेंद्र जोशी यांनी दिली. जोशी म्हणाले, ‘आयएलएमएस 2.0 या प्रणालीनुसार इच्छुक अर्जदारांनी 5 जानेवारीपासून अर्ज भरताना कागदपत्रांची पूर्तता केली. परंतु, चार ते पाच दिवसांचा अवधी झाल्यानंतर देखील पडताळणी प्रक्रिया पार पडली जात नसल्याने अर्जदार प्रतिक्षेत असल्याचे समोर आले.’

 

Back to top button