पुणे : चिनी मांजा जप्त; रविवार पेठेत गुन्हे शाखेची कारवाई | पुढारी

पुणे : चिनी मांजा जप्त; रविवार पेठेत गुन्हे शाखेची कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा : संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजी करण्यासाठी प्रतिबंधित चिनी मांजाची विक्री करणार्‍या दुकानदाराविरोधात गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उगारत गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी (दि. 9) रविवार पेठेतील दुकानदाराविरुद्ध कारवाई करीत 17 हजारांचा मांजा जप्त केला आहे. रविवार पेठ परिसरात मांजा साठवणूक करून विक्री केल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती.

त्यानुसार पथकाने संबंधित दुकानावर छापा टाकला असता, त्याठिकाणी प्रतिबंधित 24 रील मांजा धागा आढळून आला. पथकाने 17 हजारांचा मांजा जप्त करीत आरोपीविरुध्द खडक पोलिस ठाण्यात 188 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कामगिरी सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, पाटील, अंमलदार अजय राणे, आण्णा माने, राजेंद्र कुमावत, इम्रान नदाफ, पठाण, हनुमंत कांबळे यांनी केली.

वकिलाचा मुलगा जखमी
नुकतेच एका घटनेत कर्वेनगरच्या पुलावर दोन मित्र दुचाकीवरून चालले असताना दुचाकीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला. सीबीआयचे माजी सरकारी वकील आयुब पठाण यांनी आपला अनुभव ‘पुढारी’शी शेअर केला. दि. 20 डिसेंबर रोजी आयुब पठाण यांचा मुलगा सिमाब हा त्याच्या मित्राबरोबर दुचाकीवर मागे बसून वारजे येथे घरी निघाला होता. या वेळी पुलावर दुचाकी चालविणार्‍या मित्राच्या कपाळाला मांजाने जखम केली. नंतर मांजा सिमाबच्या तोंडाला अडकला. यामध्ये सिमाब जखमी होऊन त्याचा रक्तस्रावही झाला. त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार करून त्याला तब्बल अठरा टाके घालावे लागले.

Back to top button