पुणे : माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळला | पुढारी

पुणे : माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिवाजीराव भोसले बँक प्रकरणातील मुख्य आरोपी माजी आमदार अनिल भोसले यांनी वैद्यकीय कारणास्तव केलेली तात्पुरत्या जामिनाची मागणी आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयाने फेटाळली. भोसले यांनी किडनीच्या आजाराचे उपचार ससून रुग्णालयात उपलब्ध नाहीत ते केवळ रुबी, पूना हॉस्पिटल येथेच होत असल्याने तसेच प्रकृती गंभीर झाल्याने जामिनावर सोडण्यात यावे, असा अर्ज केला होता.

मात्र, त्याला मूळ फिर्यादी व गुंतवणूकदारांचे वकील सागर कोठारी, सरकारी वकील विलास पठारे यांनी विरोध केला. कोठारी यांनी भोसले एकाच वेळी उच्च न्यायालय मुंबई आणि विशेष न्यायालय पुणे येथे जामिनाचा अर्ज करून दोन्ही न्यायालयांपुढे माहिती लपवून न्यायालयाची फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच ससूनने दिलेल्या वैद्यकीय अहवालांबाबत आक्षेप घेतल्याने न्यायालयाने ही बाब ग्राह्य धरत अहवालाबाबत देखील प्रश्नार्थक मत नोंदविले.

या प्रकरणात भोसले यांची पत्नी रेश्मा भोसले अजून फरार आहेत आणि इतर बारा आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या बाबी न्यायालयाने त्यांच्या निरीक्षणात नमूद केल्या आहेत. पठारे यांनी भोसले यांना उपचारांकरिता जामिनावर सोडण्याची गरज नसून, नियमानुसार सरकारी किंवा खासगी रुग्णालयात ते उपचार घेऊ शकतात, असा युक्तिवाद केला.

Back to top button