पुरंदर-बारामतीच्या वेशीवर भेदभावाचे चित्र | पुढारी

पुरंदर-बारामतीच्या वेशीवर भेदभावाचे चित्र

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : पुरंदरच्या विकासाचे अनेक प्रकल्प बारामतीला पळविले जातात, असा आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे अनेकवेळा करतात. याचाच प्रत्यय सासवड-सुपे रस्त्यावरील पुरंदर-बारामती तालुक्याच्या हद्दीवर गेल्यावर प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. एका बाजूला खडतर, खड्डेमय व अरुंद रस्ता; तर दुसर्‍या बाजूला स्वच्छ, सुंदर, चकाचक डांबरीकरण व दोन गाड्या एकावेळी एका बाजूने धावतील असा रुंद रस्ता, असे भेदभावाचे चित्र या हद्दीवर सध्या पाहायला मिळत आहे.

पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, आंतरराष्ट्रीय बाजार, पुरंदरचे पाणी, असे अनेक प्रकल्प व पुरंदरच्या वाट्याचा विकास निधी बारामती आणि इतर तालुक्यांत पळविला जातो. पुरंदरला विकासाबाबतीत डावलले जाते. या सर्व षड्यंत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचा हात असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे वारंवार आपल्या भाषणातून करतात. याचाच प्रत्यय सासवड-सुपे रस्त्यावरील बारामती व पुरंदरची हद्द असलेल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे.

पुरंदरच्या बाजूला कच्चा, खड्डेमय व अरुंद रस्ता आहे; तर बारामतीच्या बाजूला रुंद, दर्जेदार व चकाचक डांबरीकरण रस्त्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे पुरंदर तालुक्यावर निधीबाबतीत अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय बाजार यांसारख्या प्रकल्पांबरोबर पुरंदर तालुक्यात विशेष निधीची तरतूद होणार की आंतरराष्ट्रीय प्रकल्पांच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय भेदभाव कायम राहणार, हे भविष्यातील प्रकल्पांच्या मंजुरीनंतर पाहायला मिळणार आहे. सध्यातरी खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती-पुरंदरमध्ये विकासाबाबतीत भेदभाव असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button