पुणे : धार्मिक अन् सांस्कृतिक पर्यटनाची गाडी रुळावर; पर्यटकांचा चांगला प्रतिसाद | पुढारी

पुणे : धार्मिक अन् सांस्कृतिक पर्यटनाची गाडी रुळावर; पर्यटकांचा चांगला प्रतिसाद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देश-विदेशातील पर्यटकांची धार्मिक स्थळांना भेट अन् वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती यामुळे पुण्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, सिंगापूर आदी देशांसह राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांतील पर्यटक पुण्यातील धार्मिक स्थळांना भेट देत असून, सांस्कृतिक कार्यक्रमांनाही देशविदेशातील पर्यटकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे धार्मिक-सांस्कृतिक पर्यटनाला गेल्या वर्षभरात चालना मिळाली आहे.

विशेष म्हणजे ऑगस्ट ते डिसेंबर या काळात धार्मिक-सांस्कृतिक पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नवीन वर्षांतही धार्मिक-सांस्कृतिक पर्यटन आणखी बहरणार असून, त्यादृष्टीने धार्मिक संस्था-सांस्कृतिक संस्थांनी नियोजन केले आहे. दोन वर्षांनंतर धार्मिक-सांस्कृतिक पर्यटनाची आर्थिक गाडी रुळावर आली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन बंद होते.

मार्च 2022 नंतर धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन सुरू झाले. आता पुण्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन बहरले असून, विशेषत: धार्मिक पर्यटनासाठी पुण्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी असून, विविध धार्मिक स्थळांच्या भेटीसह धार्मिक संस्थांनाही पर्यटक भेट देत आहेत. तर, पुण्यात होणार्‍या महोत्सवांना, कार्यक्रमांना अन् संगीत मैफलींनाही देशविदेशांतून येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढत आहे.

त्यामुळे यावर अवलंबून असणार्‍या संस्था, व्यावसायिक, कलाकारांनाही त्याचा आर्थिक फायदा होत आहे. नवीन वर्षातही अधिकाधिक पर्यटकांनी भेट द्यावी, यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांनी विशेष नियोजन केले आहे. ऑनलाइन प्रसिद्धीसह विविध उपक्रमांद्वारे धार्मिक स्थळांची आणि कार्यक्रमांची माहिती जगभरातील पर्यटकांपर्यंत पोचवली जाणार आहे. त्यासाठी खास सोशल मीडिया टीमही तयार करण्यात आली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, ’पुण्यातील धार्मिक पर्यटनाला गेल्या वर्षभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गणेशोत्सवासह नवरात्रोत्सवात तर धार्मिक पर्यटन आणखी बहरले होते. आताही अनेक पर्यटक पुण्यातील धार्मिक स्थळांना भेट देत असून, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरालाही भेट देणार्‍यांची संख्याही मोठी आहे. धार्मिक पर्यटनाची आर्थिक गाडीही रुळावर आली आहे. येत्या नवीन वर्षातही धार्मिक पर्यटन आणखी बहरणार आहे.

Back to top button