पुणे : दक्षिण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत | पुढारी

पुणे : दक्षिण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहराच्या दक्षिण भागातील पाणीपुरवठा सलग तिसर्‍या दिवशी विस्कळीत झाला असून, त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलचे नितीन कदम यांनी केली आहे. दरम्यान, पद्मावती येथील टाकी आणि पर्वती येथील जलकेंद्रांत काही कामे करण्यात येत असल्याने हा पुरवठा विस्कळीत झाला असून, तो दोन दिवसांत तो पूर्ववत होईल, असे महापालिका पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

पर्वतीदर्शन, लक्ष्मीनगर, संपूर्ण सहकारनगर, अरण्येश्वर, संभाजीनगर, तळजाई परिसर, बिबेवाडी परिसर, मार्केट यार्ड परिसर भागांतील नागरिकांना गेले तीन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. याविषयी विद्युत विभागाचे रामदास तारू व कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा असित जाधव यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कदम यांनी केला.

यासंदर्भात पावसकर यांना विचारणा केल्यानंतर पद्मवती येथील टाकी आणि पर्वती येथील जलकेंद्रात शनिवारी सायंकाळी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे शहराच्या दक्षिण भागाचा पाणीपुरवठा काहीसा विस्कळीत झाला आहे. हा बिघाड दुरूस्त करण्याचे काम सुरू असून, दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असेही पावसकर यांनी सांगितले.

Back to top button