पिंपरी : पदपथावर पार्किंग केल्यास दंडात्मक कारवाई ; पालिका आयुक्त शेखर सिंह यांचा इशारा | पुढारी

पिंपरी : पदपथावर पार्किंग केल्यास दंडात्मक कारवाई ; पालिका आयुक्त शेखर सिंह यांचा इशारा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील पदपथ हे पादचार्‍यांसाठी आहेत. ते पार्किंगसाठी नाहीत. पदपथावर पार्किंग होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ही बाब लक्षात घेता पदपथांवर पार्किंग करणारांच्या विरोधात पोलिसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त शेखर सिंह यांनी शनिवारी स्पष्ट केले. शहरातील पदपथांवर सर्रास पार्किंग होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. काही ठिकाणी पदपथांवर दुचाकी व चारचाकी वाहने लागलेली असतात. त्याशिवाय, पदपथांवर अतिक्रमणे झाली आहेत. टपर्या, पथारी टाकून पदपथ बळकावण्यात आले आहेत. रावेत येथील रस्त्यांलगत असलेल्या पदपथावर कार लावल्या जात असल्याची तक्रार योगिता समगीर यांनी केली आहे.

त्यांच्या या तक्रारीची दखल घेऊन त्याबाबत फेसबुक लाइव्हमध्ये भूमिका स्पष्ट करताना शेखर सिंह म्हणाले, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. तशीच नागरिकांनीदेखील त्यांची जबाबदारी पाळणे गरजेचे आहे. पदपथ हे पार्किंगसाठी नाहीत. त्यांचा वापर पादचार्‍यांना चालण्यासाठीच व्हायला हवा. पदपथावर होणार्या पार्किंगसंदर्भात पोलिस प्रशासनाच्या मदतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

कमी अंतरासाठी पायी चाला, सायकल वापरा

नागरिकांना एक ते दोन किलोमीटर अंतरावर जायचे असल्यास पायी चालण्याचा पर्याय निवडावा. 2 ते 4 किलोमीटरच्या अंतरात जायचे असल्यास सायकलचा वापर करावा. शहरात झालेल्या रिव्हर सायक्लोथॉनला 20 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. लोकांमध्ये सायकल वापरण्याबाबत उत्साह आहे. तो दैनंदिन आयुष्यातही दिसायला हवा. 4 किलोमीटर पुढील प्रवासासाठी बस, अ‍ॅटो रिक्षा, मेट्रो, खासगी बसेस असे पर्याय वापरता येतील. खासगी वाहनांचा वापर कमी व्हायला हवा, असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

नागरिकांचे प्रश्न व आयुक्तांचे उत्तर

प्रश्न :  भक्ती-शक्ती चौक ते किवळे दरम्यान बीआरटीएस रस्त्याचे काम कधी पूर्ण होईल ?
उत्तर ः या रस्त्याच्या कामात भूसंपादनाचा अडथळा होता. हा प्रश्न सुटला आहे. तसेच, उच्च दाबाची वीजवाहिनी हलवावी लागणार होती. त्याचे कामदेखील सुरू झाले आहे. येथील पूल व पुलाला जोडणारा रस्ता यांचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

प्रश्न :  शहरात अनेक ठिकाणी सिग्नल बंद आहे. त्याबाबत काय कारवाई करण्यात येईल?
उत्तर ः शहरात कोणत्या ठिकाणी सिग्नल बंद आहेत, कोठे सुरू आहेत, याचा आढावा घेण्यात येईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापर करून अ‍ॅटोमेटिक ट्रॅफिक कन्ट्रोल सिस्टिम विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्गावरील वाहतूक पाहून त्यानुसार सिग्नलची वेळमर्यादा निश्चित करण्यात येईल. या पद्धतीचा वापर केल्यानंतर एखाद्या अ‍ॅम्ब्युलन्ससाठी ग्रीन कॉरिडॉर देणेदेखील शक्य होणार आहे.

Back to top button