नगर : चौथ्या दिवशी सुटले आमदार लंके यांचे उपोषण | पुढारी

नगर : चौथ्या दिवशी सुटले आमदार लंके यांचे उपोषण

नगर : पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे दिलेले आश्वासन आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेली विनंती मान्य करीत आमदार नीलेश लंके व त्यांच्या सहकार्‍यांनी चौथ्या दिवशी आमरण उपोषण मागे घेतले. नगर पाथर्डी, नगर -शिर्डी व नगर -करमाळा या तीनही रस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी लेखी पत्र तयार केले. हे पत्र विरोधी पक्षनेते पवार व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते आमदार लंके यांना देण्यात आले. उपोषण मागे घेताच उपस्थित कार्यकर्त्यांनी आमदार लंके यांचा जयघोषण केला. या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार शनिवारी दुपारी सव्वाबारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. भोसले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता शेलार, कार्यकारी अभियंता नितीन पालवे व आरडीसी राजेंद्र कुमार पाटील, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन तसेच माजी आमदार दादा कळमकर, घनश्याम शेलार, डॉ. क्षितीज घुल, रावसाहेब खेवरेे व उपोषणकर्ते उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता शेलार, जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याकडून कामांची वस्तुस्थिती जाणून घेतली. लंके यांनी उपस्थित केलेल्या कामांची देखील माहिती घेतली. त्यानंतर पवार यांनी मंत्री गडकरी यांच्याशी थेट दूरध्वनीव्दारे संवाद साधला. त्यानंतर आमदार लंके यांच्या हातात फोन देत गडकरी यांच्याशी त्यांचे बोलने करुन दिले. आमदार लंके यांचे म्हणणे एकूण घेतल्यानंतर मुख्य अभियंता यांच्याशी गडकरी बोलले. त्यानंतर पुन्हा पवार- गडकरी यांचे बोलणे झाले.

नगर-पाथर्डी मार्च 2023 अखेर पूर्ण

नगर -पाथर्डी रस्त्यावरील मेहकरी ते फुंदेटाकळी या प्रकल्पाचे काम सुरु असून, या ठिकाणी यंत्रांची संख्या वाढवली. या कामास वेग येणार आहे. शनिवारपासून देवराई गावाजवळील उर्वरित लांबीतील काम सुरु झाले. 30 डिसेंबरपर्यंत वाहतूक सुरळीत सुरु होणार आहे. सध्यस्थितीत बाकी असलेले काम 31 मे 2023 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आ. लंके यांना दिले आहे.

नगर-शिर्डीसाठी फेब्रुवारीपर्यंत नवीन ठेकेदार

सावळीविहिर ते विळद घाट या 75 कि.मी. लांबीतील अर्धवट शिल्लक कामासाठी 4 नोव्हेंबरपासून निविदा प्रक्रिया सुरु असून, 22 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यासाठी जानेवारी/ फेब्रुवारी2023 पर्यंत नवीन ठेकेदाराची नियुक्ती अपेक्षित असल्याचे पत्र राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिलेले आहे.

रेल्वे उड्डाणपूल 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण

नगर येथील कायनेटिक चौक ते वासंदे फाटा या रस्त्यावरील लोणी व्यंकनाथ येथील रेल्वे उडडाणपूल कामाचा सीओएस प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर 24 महिन्यांत व बाजूचे सेवा रस्त्याचे काम 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. उर्वरित काम पूर्ण करण्याचे आश्वासन राज्य रस्ते विकास महामंडळाने दिले.

मंत्री गडकरींच्या शब्दाची खात्री

नगर -पाथर्डी रस्त्याचे काम मार्च 2023 पर्यंत पूर्ण होईल, नगर-मनमाड रस्त्याची जानेवारीपर्यंत निविदेची प्रक्रिया पूर्ण होऊन, फेब्रुवारीपासून काम सुरु होणार आहे. मंत्री गडकरी यांनी शब्द दिला. त्यांच्या शब्दाची खात्री आहे. मात्र, सरकारी कामे पूर्ण होण्यास वेळ लागतो. ही कामे पूर्ण व्हावीत, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. प्रसंगी आमदार लंके यांना बरोबर घेऊन मुंबई व दिल्लीत केंद्रीय मंत्री गडकरींच्या सोबत पुन्हा चर्चा करु, मात्र, यासाठी आमदार लंके व त्यांच्या साथीदारांनी आमरण उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती विरोधी पक्षनेते पवार यांनी केली.

पवारांनी जबाबदारी घेतल्याने उपोषण मागे

अजित पवार यांनी थेट केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या समवेत माझे बोलणे करून दिले. त्यांच्या अधिकार्‍यांचे लेखी पत्र मिळाले. याकामाबाबत स्वतः पवार यांनी जबाबदारी घेतली. त्यामुळे केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आश्वासन व पवार यांनी केलेली विनंती लक्षात घेऊन, उपोषण मागे घेत असल्याची घोषणा आमदार लंके यांनी केली. उपोषण मागे घेताच कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणादून गेला. विरोधी पक्षनेते पवार यांच्या हस्ते आमदार लंके, शिवशंकर राजळे, अ‍ॅड. हरिहर गर्जे, किसन आव्हाड, राजेंद्र दौंडे व हरिदास जाधव या उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले.

Back to top button