बेट भागात ट्रॅक्टरद्वारे धोकादायक ऊस वाहतूक | पुढारी

बेट भागात ट्रॅक्टरद्वारे धोकादायक ऊस वाहतूक

पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा :  शिरूर तालुक्यातील बेट भागात क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहनामध्ये भरून तसेच उसाने भरलेल्या दोन ट्रॉली अनधिकृतपणे एका ट्रॅक्टरला जोडून ऊस वाहतूक होत आहे. साखर कारखान्यावर होणारी ही वाहतूक अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहे. रस्त्याने जाताना वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून बेकायदेशीररीत्या धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करणार्‍या या ट्रॅक्टर चालक आणि मालकांवर कारखान्यांकडून कडक नियम लावण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

ऊस वाहतूक करणार्‍या बहुतांशी ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडलेल्या असतात. काही महाभागांकडून अनेक वेळा क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरलेल्या अनधिकृतपणे दोन ट्रॉल्या ट्रॅक्टरला जोडून ऊस वाहतूक केली जाते. चढावाच्या ठिकाणी ट्रॅक्टर चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उसाचे ट्रॅक्टर चढाच्या ठिकाणी उलटून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. परंतु ट्रॅक्टर चालक उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या जोडून ट्रॅक्टर रस्त्याने बेफिकीरपणे चालवत असतात. ट्रॅक्टर चालकांकडून होणारा निष्काळजीपणा दुसर्‍याच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे.

रस्त्याने जाताना दोन ट्रेलर उसाने भरलेले असल्यामुळे या चालकास पाठीमागून येणार्‍या मोटारसायकल व इतर वाहनांचा अंदाज येत नाही. काही वेळा चालकाच्या कानाजवळ मोठ्या स्पीकरच्या व धुंद गाण्याचा आवाज सुरू असल्याने इतर वाहनांच्या हॉर्नचा आवाज तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा वेळेस मोटारसायकल व इतर वाहन चालक जीव मुठीत धरून ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना पाहायला मिळतात. रस्त्याची झालेली दुरवस्था, खचलेली साईडपट्टी, अनेक ठिकाणी रस्त्याला असलेले चढ-उतार आणि ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रॉल्या यामुळे रस्त्याने चालणारे पादचारी तसेच इतर वाहन चालक मोटारसायकलस्वार, शाळेतील मुले हैराण झाली आहेत.

कारखान्याकडून प्रोत्साहन दिले जाते का?

वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून मोठ्या प्रमाणात क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून अनधिकृत वाहतूक सुरू आहे. असे असतानाही यावर संबंधित अधिकारी गप्प असून कारखान्यांकडूनही कोणतेच नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे या वाहतुकीला कारखान्याकडून प्रोत्साहन दिले जाते की काय अशी शंका आता येऊ लागली आहे.

 

 

Back to top button