पुणे : मुक्त, दूरशिक्षणसाठी पूर्वपरवानगीचे बंधन | पुढारी

पुणे : मुक्त, दूरशिक्षणसाठी पूर्वपरवानगीचे बंधन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशभरातील श्रेणीबद्ध स्वायत्तता (ग्रेडेड ऑटॉनॉमी) प्राप्त विद्यापीठांना मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आता विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यूजीसीने 2018 मधील नियमावलीमध्ये दुरुस्ती करून श्रेणीबद्ध विद्यापीठांनी मान्यता घेण्याचा नियम समाविष्ट केला असून, तसा निर्णयच जाहीर केला आहे.
उच्च शिक्षणासंदर्भात यूजीसीकडून अलीकडे काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

त्यात आता श्रेणीबद्ध विद्यापीठांच्या मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रमांबाबतही महत्त्वपूर्ण बदलाची भर पडली आहे. श्रेणीबद्ध विद्यापीठांनी मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत यूजीसीने 2018 मध्ये नियमावली केली होती. त्या नियमावलीनुसार श्रेणीबद्ध विद्यापीठांना यूजीसीच्या मान्यतेशिवाय मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रम थेट सुरू करण्याची मुभा होती.

केवळ संबंधित अभ्यासक्रमासाठी आवश्यक बाबींची पूर्तता विद्यापीठांनी करणे आवश्यक होते. आता या नियमात यूजीसीकडून दुरुस्ती करण्यात आली आहे. आता श्रेणीबद्ध विद्यापीठांनाही मुक्त आणि दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी यूजीसीची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे.

Back to top button