शिर्सुफळ-गाडीखेल रस्त्याला मुहूर्त | पुढारी

शिर्सुफळ-गाडीखेल रस्त्याला मुहूर्त

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा : शिर्सुफळमार्गे जाणार्‍या गाडीखेल रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली होती. रस्त्यावर मोठमोठी खडी पडल्याने रस्तावाहतुकीस अत्यंत धोकादायक झाला होता. रस्ता बर्‍याच महिन्यांपासून दुरुस्तीविना रखडला होता. रस्त्याची पाहणी करण्यासाठी अधिकारी व ठेकेदार येत नव्हते. मात्र, या घटनेची दै. ‘पुढारी’ वृत्तपत्राने दखल घेत हे वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले व रोडचे काम सुरू केले.

रस्त्यावरून शाळकरी मुले तसेच बारामती औद्योगिक वसाहतीकडे कामगारवर्ग तसेच इतर सर्वसामान्य नागरिकांची ये-जा होत असते. आता या सर्वांचीच सोय होणार असल्याने येथील नागरिकांनी दैनिक मपुढारीफचे आभार मानले. शिर्सुफळ ते गाडीखेल रस्ता अत्यंत खराब झाल्याने मुलांना तसेच शेतकर्‍यांना या रस्त्याने जाणे अवघड झाले होते.

छोटे-मोठे अपघात वारंवार होत होते. परंतु, ग्रामपंचायत पाठपुरावा व वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होताच रस्तादुरुस्ती करण्याचे काम चालू झाल्याने सर्व ग्रामस्थांनी आभार मानले, असे मत सरपंच बाळासाहेब आटोळे यांनी व्यक्त केले. तर हे काम सुरू झाले आहे; मात्र लवकरात लवकर व उत्कृष्ट दर्जाचे व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ गोरख आवडे यांनी व्यक्त केली.

Back to top button