पुणे : ‘बालकुमार साहित्य’च्या सभेत गदारोळ; अध्यक्षपदी राजन लाखेंची निवड | पुढारी

पुणे : ‘बालकुमार साहित्य’च्या सभेत गदारोळ; अध्यक्षपदी राजन लाखेंची निवड

पुणे; पुढारी वृत्तसेवा : संस्थेच्या घटनेनुसार निवडणूक प्रक्रिया राबविली गेली नसल्याचा आक्षेप घेतल्याने अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या रविवारी (दि. 4) झालेल्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. संस्थेची बिनविरोध कार्यकारिणीची घोषणा, विद्यमान अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे यांनी घेतलेली अध्यक्षपदावरून निवृत्ती आणि नवीन अध्यक्ष म्हणून राजन लाखे यांच्या नावाची घोषणा, अशा घटना या वादळी सभेत घडल्या. नव्या कार्यकारिणीच्या निवडीवर आक्षेप घेत धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागण्यात येणार असल्याचे काही सदस्यांनी या वेळी जाहीर केले.

संस्थेच्या पदाधिकार्‍यांची मुदत संपल्याने निवडणुकीचा कार्यक्रम मागील आठवड्यात जाहीर करण्यात आला होता. ज. गं. फगरे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. मात्र, कार्यकारिणीसाठी इच्छुकांची नावे निवडणूक निर्णय अधिकार्‍याऐवजी कोशाध्यक्षांकडे व्हॉट्सअ‍ॅपवर तसेच पोस्टाने मागविण्यात आली. मतदार यादीसंदर्भात हरकती व सूचना मागवून दुरुस्त यादी जाहीर न करणे, घटनेनुसार निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली नाही, असा आक्षेप घेत संस्थेच्या आजीव सभासदांनी सभेत मुद्दे उपस्थित केले.

विविध मुद्द्यांवरून सभेमध्ये गदारोळ झाला. सहा शाखांनाही मतदानाचा अधिकार का नाकारला? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या गदारोळातच डॉ. बर्वे यांनी अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फगरे यांनी संस्थेच्या अध्यक्षपदासाठी लाखे यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, घटनेनुसार निवडणूक प्रक्रिया राबवून कार्यकारिणीची निवड करावी, या मागणीवर ठाम असलेल्या सभासदांनी लाखे यांच्या निवडीबाबत आक्षेप नोंदविला.

दरम्यान, या सभेला निम्मे कार्यकारिणी सदस्य गैरहजर होते. विविध मुद्द्यांवरून सदस्यांनी आक्षेप घेत विरोध केला. यावरून सभेत बराच गदारोळही झाला. त्यानंतर सभेत माजी सहकार्यवाह सुनील महाजन यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी विरोध केला. ही निवडणूक घटनाबाह्य आहे. त्यामुळे ती रद्द करावी, अशी मागणी काही सदस्यांनी केली.

ही आहे नवीन कार्यकारिणी…
राजन लाखे यांची अध्यक्षपदी तर डॉ. दिलीप गरुड यांची कार्यवाहपदी निवड झाली आहे. उपाध्यक्ष – विलास रासकर, कोशाध्यक्ष – बी. आर. माडगूळकर, सहकार्यवाह – भरत सुरसे; विजय जगताप, सीमा चव्हाण, मीरा शिंदे, कविता मेहंदळे, विश्वनाथ भुजबळ आदी कार्यकारिणी सदस्यपदी निवडून आले आहेत.

सभेत मी अध्यक्षपदापासून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. फगरे यांनी जाहीर केल्यानुसार राजन लाखे यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे दिली.

                       – डॉ. संगीता बर्वे, मावळत्या अध्यक्षा, बालकुमार साहित्य संस्था

घटनेनुसार संस्थेची निवडणूक घेण्याऐवजी परस्पर नव्या अध्यक्षांचे आणि कार्यकारिणी सदस्यांचे नाव घोषित करण्याला आक्षेप आहे. या निर्णयाविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागण्यात येणार आहे.

                                                         – सुनील महाजन,
                                          मावळत्या कार्यकारिणीतील सहकार्यवाह

Back to top button