पिंपरी : मुळानदी सुधार प्रकल्प पालिका स्वतः: राबवणार | पुढारी

पिंपरी : मुळानदी सुधार प्रकल्प पालिका स्वतः: राबवणार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पुणे महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास पिंपरी-चिंचवड महापालिका केवळ निधी उपलब्ध करून देणार असे ठरलेले असताना, अचानक त्यात बदल करून तो प्रकल्प आता पालिका स्वत: राबवित आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात तब्बल 321 कोटींची निविदा पालिकेच्या पर्यावरण विभागाने प्रसिद्ध केली आहे. प्रशासकीय राजवटीत बदलेल्या भूमिकेबद्दल आणि इतक्या मोठ्या प्रमाणातील खर्चाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या तीन नद्या वाहतात. त्यातील पवना व इंद्रायणी नदी सुधार योजना पालिका राबवित आहे.

मुळा नदीचा प्रकल्प पुणे पालिका राबवित असून, त्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिका निधी उपलब्ध करून देणार होती. पालिका हद्दीत वाकड बायपास ते बोपखेल असे एकूण 14.40 किलोमीटर असे मुळा नदीचे एका बाजूचे काठ आहे. त्यात पिंपळे निलख,दापोडी, बोपखेल येथे संरक्षण विभागाचा भाग आहे. सल्लागारांच्या आराखड्यानुसार या कामासाठी 750 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प पुणे पालिका राबविणार होती. त्यासाठीचा खर्च पिंपरी-चिंचवड पालिका पुण्यास देणार होती. त्याला तत्कालीन आयुक्तांनी 31 ऑगस्ट 2015 ला मान्यता दिली होती. तसा मागील पंचवार्षिकेत तसा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूरही झाला आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेचा हा संयुक्त प्रकल्प मोडित काढत प्रशासकीय राजवटीत अचानक तो निर्णय बदलण्यात आला. प्रत्यक्ष निविदा काढण्याच्या वेळी पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेने स्वतंत्रपणे निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्णय का बदलला ? त्याचे उत्तर गुलदस्तात आहे. स्वतंत्र निविदा काढण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची 27 सप्टेंबरला आणि पालिका सभेची 4 ऑक्टोबरला मान्यता दिली आहे. पालिकेच्या या बदललेल्या भूमिकेने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पहिल्या टप्प्यात वाकड ते सांगवीपर्यंतची नदी होणार स्वच्छ

त्यानुसार, पर्यावरण विभागाने पहिल्या टप्प्यातील वाकड ते सांगवी पूल या 8.80 किलोमीटर अंतराच्या नदीच्या एका बाजूच्या कामासाठी 320 कोटी 85 लाख 48 हजार 785 खर्चाची आंतरराष्ट्रीय निविदा 17 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली आहे. निविदेची मुदत 45 दिवसांची असून, अंतिम तारीख 5 जानेवारी 2023 अशी आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या सहभागी होतील, अशी शक्यता आहे. त्याच अंतराच्या पुण्याच्या बाजूची 304 कोटीची निविदा पुणे पालिकेने प्रसिद्ध केली आहे. निविदेस मुदतवाढ न दिल्यास आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यास एप्रिल 2023 पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊ शकते.

ही आहेत कामे

मुळा नदीचे पाणी प्रदूषणमुक्त होण्यासाठी विविध कामे केली जाणार आहेत. त्यात मैला तसेच, रासायनिक सांडपाणी नदीत थेट मिसळणार नाही, यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली जाणार आहे. ड्रेनेज वाहिन्याद्वारे सांडपाणी एसटीपीपर्यंत पोचवून त्यावर प्रक्रिया करून ते पाणी नदीत सोडले जाणार आहे. नदीकाठावरील सर्व घाट, उद्यान, स्मशानभूमी, धोबी घाट आदींची दुरुस्ती करून सुशोभित केले जाणार आहे. नदीकाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून वॉकिंग ट्रॅक बांधण्यात
येणार आहे.

काम एकाच वेळी सुरू होणार

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्या हद्दीतील 8.80 किलोमीटर अंतराच्या मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास निविदा काढली आहे. दोन्ही पालिकेची बिल अदा करण्याची पद्धत वेगळी आहे. पुण्याने क्रेडिट नोटद्वारे तर, पिंपरी-चिंचवड पालिका ईपीसी म्हणजे ठेकेदारांच्या खात्यात रक्कम जमा करते. त्यामुळे दोन्ही पालिकेने वेगवेगळी निविदा काढली आहे. त्यास आयुक्तांनी मंजुरीही दिली आहे. कामाचा सल्लागार एकच असून, काम एकाच वेळी सुरू होणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

मुळा प्रकल्पासाठीही म्युन्सिपल बॉण्ड

पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी तब्बल 2 हजार 756 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर, मुळा नदीसाठी 750 कोटींचा खर्च आहे. पवना व इंद्रायणी प्रकल्पाप्रमाणे मुळा नदीच्या खर्चासाठी पालिकेने 200 कोटींचे म्युन्सिपल बॉण्ड उभारण्याचा निर्णय आयुक्तांनी 15 नोव्हेंबरला घेतला आहे. तसा नवा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.

पवना नदी प्रकल्पास या महिन्यात मंजुरीची शक्यता

पवना व इंद्रायणी नदी प्रकल्पापैकी पवना प्रकल्पास खडकवासला, पुणे येथील सेंटर वॉटर रिसर्च सेंटरची (सीडब्ल्यूपीआरएस) हायड्रोलिक व हायड्रोलॉजीचा अहवाल मिळाला आहे. येत्या दोन आठवड्यांत राज्य शासनाच्या पर्यावरण सतिमीकडून पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र (एन्वॉयर्न्मेंंट क्लिरिअन्स सर्टिफिकेट) मिळेल, असा दावा पालिकेच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

Back to top button