कारमध्ये गुदमरून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू; अ‍ॅण्टॉप हिलमधील प्रकार | पुढारी

कारमध्ये गुदमरून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू; अ‍ॅण्टॉप हिलमधील प्रकार

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा ;  खेळण्यासाठी बाहेर पडलेल्या 7 व 5 वर्षीय बहिण भावाचा कारमध्ये अडकल्यानंतर गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी अ‍ॅण्टॉप हिल परिसरात उघडकीस आली. साजिद मोहब्बद शेख (7) आणि रिना मोहब्बत शेख (5) अशी या दोन चिमुकल्यांची नावे आहेत. खेळताना गायब झाल्यानंतर या दोघांचा शोध सुरु असताना जवळच असलेल्या एका कारमध्ये त्यांचे मृतदेह सापडले.

या दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतर या दोघांच्या मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अ‍ॅण्टॉपहिल परिसरात राहणारे मोहब्बत शेख यांची दोन मुले साजिद व रिना बुधवारी घराजवळ खेळत होती. खेळता खेळता ते दोघेही गायब झाले. शोध घेऊनही ते न सापडल्याने वडिलांनी ऍण्टॉप हिल पोलिसांत ते हरवल्याची तक्रार नोंदवली होती.

दिवसाढवळ्या दोन अल्पवयीन मुले गायब झाल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला. यानंतर शोधमोहीम सुरु असतानाच रात्री उशिरा घरापासून काही अंतराजवळ पार्क केलेल्या एका कारमध्ये ही दोन्ही मुले बेशुद्धावस्थेत आढळली. त्यांना तातडीने बाहेर काढून सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत ऍण्टॉप हिल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र अकस्मात मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या फुटेजमध्ये काही संशयास्पद दिसते का याची पाहणी केली, मात्र फुटेजमध्ये पोलिसांना काहीही संशयास्पद दिसून आले नाही, असे सांगण्यात आले.

साजिद आणि रिना हे दोघेही खेळता खेळता कारजवळ आले आणि कारमध्ये लपले. यावेळी त्यांनी कारचा दरवाजा आतून लावून घेतला. मात्र, नंतर त्यांना कारचा दरवाजा उघडता येत आला नाही. त्यामुळे कारमध्ये गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.

Back to top button