अमेरिकेच्या धर्तीवर एकच आरोग्य विमा योजना

अमेरिकेच्या धर्तीवर एकच आरोग्य विमा योजना
Published on
Updated on

कोल्हापूर : राजेंद्र जोशी : भारतात नागरिकांना सार्वजनिकरीत्या आरोग्य विम्याचे कवच मिळावे. याद्वारे नागरिकांच्या आजारांवर विनामोबदला उपचार व्हावेत आणि उपचाराविना सर्वसामान्यांचा जीव जाऊ नये, यासाठी विविध स्तरांवर आरोग्य विमा योजना कार्यरत आहेत. आता विमा योजनांच्या नावाखाली अनेक योजना राबविण्याऐवजी अमेरिकेच्या धर्तीवर भारतात एकच राष्ट्रीय विमा योजना राबविण्याच्या धोरणावरील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये सध्याच्या आयुष्मान भारत योजनेच्या उपचार खर्चाची मर्यादा पाच लाखांवरून दहा लाखांपर्यंत जाऊ शकते, असे खात्रीलायक वृत्त आहे.

निवडणुकांचे पर्व संपल्यानंतर नवे सरकार सत्तेत येताच या योजनेची अंमलबजावणी होऊ शकते, एकाच व्यक्तीसाठी त्याच्या नागरिकत्वावर, व्यवसायावर, नोकरीवर आधारित विविध विमा योजना राबविणारा भारत हा विकसित देशांच्या पंक्तीत बसण्याकडे निघालेला कदाचित एकमेव देश असेल.

देशात आयुष्मान भारत विमा योजना राबविली जाते. राज्य शासन राज्यातील जनतेसाठी राज्य शासन पुरस्कृत आरोग्य विमा योजना राबविते. औद्योगिक मजुरांसाठी राज्य कामगार विमा योजनेचा लाभ मिळतो. केंद्राच्या कर्मचार्‍यांसाठी निराळीच आरोग्य विमा योजना कार्यरत आहे आणि बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणार्‍या कामगारांसाठीही आणखी एक योजना कार्यरत आहे.

याखेरीज कार्पोरेट क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी संबंधित उद्योग विमा कंपन्यांशी संलग्न आरोग्याचे नवे कवच उभे करतात. या सर्वांचा एकत्रित विचार केला तर प्रत्येक व्यक्तीसाठी एक वा एकापेक्षा अधिक विमा योजना कार्यरत आहेत. त्यांचे प्रिमियम सरकारच्या तिजोरीतून, नागरिकांच्या खिशातून भरले जातात आणि जेव्हा रुग्णाला उपचार खर्चाच्या परताव्याची वेळ येते, तेव्हा मात्र एकाच विमा योजनेमार्फत परतावा मिळतो आणि दुसर्‍या योजनेअंतर्गत भरलेला प्रिमियम वाया जातो. ही बाब अनेक वर्षांपूर्वी निदर्शनास येणे आवश्यक होते. परंतु, विमा कंपन्या आणि योजना प्रवर्तक यांच्या दरम्यान प्रिमियमची रक्कम ठरविताना होणारी मांडवली आता विशेष चर्चेत आली आहे. यामुळेच विविध सरकारी आरोग्य योजना एकत्र करून त्यांचे 'आयुष्मान भारत पंतप्रधान आरोग्य विमा योजना' या एकाच योजनेमध्ये रुपांतर झाले, तर योजना राबविण्यात सुलभता येऊ शकते.

विविध पॅकेजेस उपलब्ध

देशात आरोग्य विम्याच्या क्षेत्रांत जशा विविध योजना कार्यरत आहेत, काही योजनांमध्ये हृदयरोगाला पॅकेजेस देताना झुकते माप आहे, तर काही ठिकाणी अस्थिरोगाला झुकते माप आहे. कर्करोगावरील उपचारासाठी शस्त्रक्रिया आणि किरणोत्सर्गासाठी कमी पॅकेज, तर किमोथेरपीसाठी थोडे अधिक पॅकेज, मेंदूवरील शस्त्रक्रिया, मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया आणि डायलेसिसचे उपचारांच्या पॅकेजेसमध्ये आखडता हात घेतल्यामुळे योजनेशी संलग्न बहुतांश रुग्णालयात योजना खर्च परवडत नाही. या सर्व गोष्टींना एकमेव सर्वंकष राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेमुळे चाप बसू शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news