खडकवासला परिसरामध्ये गोवरचे दोन संशयित रुग्ण | पुढारी

खडकवासला परिसरामध्ये गोवरचे दोन संशयित रुग्ण

दत्तात्रय नलावडे

खडकवासला : मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यातही गोवरची लागण सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सिंहगड परिसरासह खडकवासला, धायरी, सिंहगड रस्ता भागातील बालकांसाठी गोवर प्रतिबंधक विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे. यात गेल्या तीन दिवसांत सिंहगड- खानापूर भागात 33 व खडकवासला-धायरी भागात 53, अशा एकूण 86 बालकांना गोवर प्रतिबंधक लस टोचण्यात आली. खडकवासला भागात गुरुवारी गोवरचे दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

खडकवासला आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शब्दा शहापूरकर म्हणाल्या, ’गोवर संशयित एक बालक व एक नागरिक अशा दोघांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.’ आरोग्य विभागाच्या मोहिमेत गोवरसह कोणत्याही लसीचा डोस न घेतलेले चार वर्षांचे एक बालक खडकवासला भागात सापडले. तसेच नवव्या महिन्यात पहिला डोस घेतलेल्यानंतर दीड वर्षाच्या वयात गोवरचा ’दुसरा बूस्टर’ डोस न घेतलेल्या बालकांची संख्या अधिक असल्याचे या मोहीमेत पुढे आले आहे.

खानापूर येथे आदिवासी मेळाव्यात आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत गोवर लसीकरणापासून आदिवासी कातकरी समाजाची सात बालके वंचित असल्याचे गंभीर चित्र पुढे आले. या बालकांना खानापूर आरोग्य केंद्राच्या पथकाने मेळाव्यातच गोवर प्रतिबंधक बूस्टर डोस दिला. खानापूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वागत रिंढे, आरोग्य सहायक विजय मते, परिचारिका नीता मुसळे यांच्यासह आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचार्‍यांच्या पथकाने गोवर प्रतिबंधक लस न घेतलेल्या बालकांची शोधमोहीम सुरू केली आहे. सिंहगड किल्ल्याच्या डोंगर दर्‍यासह खामगाव मावळ, आंबी, वरपेवाडी, सोनापूर ,डोणजे आदी ठिकाणी घरोघरी जाऊन लस न घेतलेल्या बालकांची तपासणी केली जात आहे.

महापालिकेत समावेश केलेल्या दाट लोकवस्तीच्या धायरी, खडकवासला, किरकटवाडी, नांदेड भागात गोवर प्रतिबंधक लस न घेतलेल्या बालकांची संख्या अधिक असल्याचे गंभीर चित्र या मोहिमेतून पुढे आले आहे. खडकवासला येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्राच्या पथकाने धायरी व खडकवासला परिसरात आतापर्यंत 53 बालकांना गोवर प्रतिबंधक लसीचे पहिला व दुसरा बूस्टर डोस दिले. शिवणे, उत्तमनगर परिसरातही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गोवर प्रतिबंधक लसीकरणासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.

परराज्यातील आलेल्या मुलांचे लसीकरणच नाही!
बालकांना नवव्या महिन्यात पहिला व दीड वर्षात दुसरा बूस्टर डोस देणे गरजेचे आहे. मात्र, अनेक बालकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. तसेच परप्रांतातून आलेल्या पालकांनी आपल्या बालकांना कोणतीही रोगप्रतिबंधक लस दिली नसल्याचे या मोहिमेतून पुढे आले आहे.

मोहीम दृष्टिक्षेपात…
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून शोधमोहीम सुरू
गेल्या तीन दिवसांत 86 बालकांचे गोवर प्रतिबंधक लसीकरण
घरोघरी जाऊन लस न घेतलेल्या बालकांची तपासणी
लस न घेतलेल्या बालकांची संख्या अधिक असल्याचे समोर

आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत 33 बालकांना गोवर प्रतिबंधक लस टोचण्यात आली. बालकांची शोधमोहीम सुरू असून लस न घेतलेली बालके आढळल्यानंतर लगेचच लसीकरण केले जाणार आहे.
                                                                     – डॉ. स्वागत रिंढे,
                                                      वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद, खानापूर

Back to top button