तळेगाव ढमढेरे : बेकायदा प्लॉटिंगमध्ये गुंठा विक्री जोरात; फसवणूक होण्याची दाट शक्यता | पुढारी

तळेगाव ढमढेरे : बेकायदा प्लॉटिंगमध्ये गुंठा विक्री जोरात; फसवणूक होण्याची दाट शक्यता

तळेगाव ढमढेरे; पुढारी वृत्तसेवा : स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी ते पै-पै जमा करतात. पोटाला चिमटा घेऊन मुलाबाळांच्या मुखातला घास काढून गुंठा जमीन खरेदी करतात. परंतु, शिरूर तालुक्यात बेकायदा प्लॉटिंग विक्री जोरात सुरू असल्याने यात फसवणूक होण्याची शक्यताच अधिक आहे. एक गुंठा खरेदीखत होत नाही. कधीही रद्द न होणारे कुलमुख्यत्यार पत्राच्या बळावर खरेदी-विक्री जोरात चालली आहे. सुरक्षितता नसूनही बेभानपणे गुंठा खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत.

ग्रामीण भागात पोटाची खळगी भरायला आलेली ही माणसे आधीच परिस्थितीने गांजलेली असतात. हाताला मिळेल ते काम करून पैसे जमवून जागा घेण्याचे स्वप्न पाहतात. इथे ना कोणाचा आधार, ना कोणाचा पाठिंबा, अशा परिस्थितीत ते स्वतः ला कामाला जुंपून देतात. दिवसरात्र काम करतात, चार पैसे गाठीला बांधतात. भाड्याच्या खोलीत राहून भाडे किती दिवस भरायचे, यापेक्षा स्वतःचे घर घेऊ, असे त्यांचे स्वप्न असते.

त्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झालेला प्लॉट खरेदी-विक्री व्यवसाय, त्यांची जाहिरातबाजी, त्यात आकर्षक ऑफर, हप्त्याची सोय आणि गुंठेवारी करणार्‍यांची आलिशान ऑफिस, गाडी, राहणीमान पाहून ही साधी भोळी माणसं भुलतात. यांच्या गोड बोलण्याला खरं मानतात. बिनधास्त बांधकाम करा, आता काही रक्कम भरा, मग सुलभ हप्त्याने रक्कम भरा. याप्रकारे धीर देऊन एक एक गुंठा विकला जातो. मात्र, यात त्यांची फसवणूकच जास्त होते.

जमीन घेणार्‍यांवर कारवाई
जेवढ्या रकमेचे सरकारी मूल्यांकन केले जाते व जितकी कायदेशीर रक्कम खरेदीखत, साठेखत व इतर कागदपत्रांवर उल्लेखीत असते त्याच्या पाचपट रक्कम गुंठा घेणार्‍याकडून घेतली जाते. एकतर कमी मुद्रांक शुल्क भरून, कमी रकमेचे खरेदीखत करून सरकारी नुकसान केले जाते. इथे शासनाची फसवणूक केली जाते. दुसरीकडे ज्याने गुंठा घेतला त्याच्याकडून रोख स्वरूपात मोठी रक्कम घेतली जाते, तसेच हप्त्याने वसूल केली जाते. इथे इन्कम टॅक्स विभागाची, सरकारी कार्यालयाची फसवणूक केली म्हणून गुंठेवारी करणार्‍यांवरच फक्त कारवाई होते, हे महत्त्वाचे.

Back to top button