बाणेरला केबल टाकण्यासाठी ‘रात्रीस खेळ चाले’! | पुढारी

बाणेरला केबल टाकण्यासाठी 'रात्रीस खेळ चाले'!

मोहसीन शेख

बाणेर : परिसरात मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी अनधिकृतपणे खड्डे खोदून केबल टाकण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांनी खोदाई करणारे पकडून दिल्यानंतर देखील त्यांच्यावर ठोस कारवाई झाली नाही. यामुळे महापालिका व पोलिस प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.

बाणेर भागातील स्थानिक कार्यकर्त्यांना हाताशी धरूनअनधिकृत पद्धतीने खोदाई करून केबल टाकल्या जातात. काही कंपन्या खोदाईचे पैसे वाचवण्यासाठी स्थानिकांशी हातमिळवणी करून या केबल टाकण्यास सांगतात. रात्री सुमारास अशाच पद्धतीने अनधिकृतपणे खोदाई करत असल्याचे लक्षात आल्यावर भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी अडवणूक केली.

या ठिकाणी पोलिस व पथ विभागाचे अधिकार्‍यांना बोलवून त्यांच्या ताब्यात एक ट्रॅक्टर, बुलेरो, ब्रेकर व पाइप देण्यात आले होते. साधारणत: पाचशे ते सहाशे मीटर लांबीची खोदाई सुरू होती. लाखो रुपयांचे चलन बुडवून नेमका कोणाच्या वरदहस्ताने हा प्रकार चालू होता, ही बाब अद्यापही गुलदस्तात आहे. याचा शोध घेण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

यानिमित्ताने उपस्थित झालेले प्रश्न…
बाणेर-बालेवाडी परिसरातील अनधिकृत खोदाईला आळा बसणार कधी?
महापालिका अधिकारी म्हणतात तक्रार वेळेवर दिली, तर पोलिस
म्हणतात तक्रार देण्यास विलंब झाला. खरे मानायचे तरी कुणाचे?
लाखो रुपयांचा महसूल बुडवून काम करून देण्यास जबाबदार कोण?
पोलिस व महापालिकेच्या कारवाईमध्ये समन्वयाचा अभाव आहे का?

घटना घडली तेव्हा रात्री पत विभागाच्या अधिकार्‍यांनी तक्रार नोंदवली होती. ट्रॅक्टरही पोलिस चौकीला जमा केला. साधारणत: ही खोदाई चारशे मीटरची झाली असून, याबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणती कंपनी हे काम करत होती त्यावर कारवाई केली जाईल. याबाबत पोलिसांना कोणत्या कंपनीचे काम सुरू होते, याचा शोध घेण्याचे पत्रही देण्यात आले आहे.

                                       – संदीप चाबुकस्वार, अधिकारी, महापालिका

पोलिस चौकीला जमा केलेले ट्रॅक्टर तक्रार देण्यास विलंब लागल्यामुळे सोडून देण्यात आले. महापालिकेने तक्रार दिल्यास सदर ट्रॅक्टरचालक व मालकाला बोलून याबाबतचा शोध घेतला जाईल.
                                                           – राजकुमार केंद्रे,
                                                        सहायक पोलिस निरीक्षक

Back to top button