पुणे : सूक्ष्म सिंचनासाठी अनुदानाची योजना | पुढारी

पुणे : सूक्ष्म सिंचनासाठी अनुदानाची योजना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक घटक योजनेत ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी शेतकर्‍यांना सुवर्णसंधी आहे. यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्ग आणि अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकर्‍यांसाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 75 ते 80 टक्क्यांपर्यंत अनुदान आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी ही माहिती दिली. महाडीबीटी संकेतस्थळावर शेतकर्‍यांनी ऑनलाइनद्वारे यासाठी अर्ज करावयाचा आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. शेतकर्‍यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये अनुदान थेट जमा करण्यात येते. केंद्र सरकारच्या सुधारित खर्च मर्यादेप्रमाणे सर्व पिकांसाठी अनुदान उपलब्ध आहे.

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 55 टक्के आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून 25 टक्के मिळून 80 टक्के अनुदान दिले जाते. तर याच दोन्ही योजनांमधून बहू भूधारक शेतकर्‍यांसाठी हेच अनुदानाचे प्रमाणे अनुक्रमे 45 व 30 मिळून 75 टक्क्यांइतके आहे. शेतकर्‍यांनी https:// mahadbtmahait. gov. in या संकेतस्थळावर अर्ज करावा.

अनुदानासाठी 8 कोटी 37 लाखांची मागणी
चालू वर्षी सूक्ष्म सिंचनासाठी 2 हजार 552 लाभार्थी शेतकर्‍यांसाठी कृषी आयुक्तालय स्तरावर 8 कोटी 37 लाख रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. अनुदान प्राप्त होताच लाभार्थ्यांना ते वितरीत केले जाईल.

Back to top button